सफाई कर्मचाऱ्यांसोबत राज ठाकरे यांच्या फोटोची चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत काढलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. राज ठाकरे यांनी खांद्यावर हात ठेवून फोटो काढल्याने कर्मचारीही भारावून गेले.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सफाई कामगारांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. टेनिस खेळण्यासाठी शिवाजी पार्कवर आलेल्या राज ठाकरेंसोबत अनेकांनी फोटो काढले. मात्र यावेळी सफाई कामगारांसोबतच्या त्यांची फोटोची चर्चा सर्वाधिक आहे.
राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कमध्ये टेनिस खेळण्यासाठी आले होते. त्यावेळी शिवाजी पार्क परिसरात काम करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे फोटो काढण्याची विनंती केली. राज ठाकरे यांनीही कर्मचाऱ्यांच्या विनंतीला मान दिला आणि फोटो काढण्यासाठी पुढे आले. यावेळी राज ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि दिलखुलासपणे फोटो काढला.
खरंतर सफाई कर्मचारी हा कायमच दुर्लक्षित राहिलेला घटक. परंतु कोरोनाच्या महामारीत सफाई कर्मचारी कोविड योद्धा म्हणून काम करत आहेत. दिवसरात्र ते शहर स्वच्छ ठेवून कोरोनाव्हायरला आळा घालत आहेत. त्याच सफाई कर्मचाऱ्यांनी जेव्हा राज ठाकरेंना त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली, तेव्हा तेही कोणताही विलंब तयार झाले. एवढंच नाही तर फोटो काढताना राज ठाकरेंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून एकप्रकारे त्यांच्या कार्याचं आपल्या कृतीतून कौतुक केलं. राज ठाकरेंनी खांद्यावर हात ठेवल्याचं पाहून कर्मचारीही भारावून गेले.
मनेसकडून शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव दरम्यान मनसेकडून काल (13 नोव्हेंबर) मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमित ठाकरे यांनी या दीपोत्सवाचं उद्घाटन केलं. मनसेच्या वतीने शिवाजी पार्क मैदानात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.