एक्स्प्लोर
2019 ला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज, मोदीमुक्त भारत करा : राज ठाकरे
मोदींनी देशाला फसवलं आहे. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे लोकांनी बेसावध राहू नये, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
मुंबई : ''भारताला 1947 साली पहिलं स्वातंत्र्य मिळालं, दुसरं स्वातंत्र्य 1977 साली मिळालं आणि आता 2019 साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा,'' असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. मोदींचा सामना करण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
मुंबईत शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’त राज ठाकरे बोलत होते. त्यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मोदींनी देशाला फसवलं आहे. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे लोकांनी बेसावध राहू नये, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
''राज्यातले सगळे प्रश्न संपले म्हणून मुख्यमंत्री गाणी गातात''
मुख्यमंत्र्यांनी नदीवर तयार केलेल्या थीम साँगवर राज ठाकरे यांनी टीका केली. ''यात दिसणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्गातील मॉनिटर आहेत. ते वर्गशिक्षकांचे आवडते असतील मात्र, विद्यार्थ्यांचे नावडते आहेत. तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शोलेतील सांबा आहेत,'' असंही राज ठाकरे म्हणाले.
''नीरव मोदी प्रकरण विसरण्यासाठी श्रीदेवीच्या बातम्या दाखवल्या''
''पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीचं प्रकरण विसरण्यासाठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या बातम्या दाखवण्यात आल्या. श्रीदेवीने असं काय कार्य केलं होतं, ज्यामुळे तिचा मृतदेह राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळण्यात आला,'' असा सवालही राज ठाकरेंनी केला.
''वृत्तपत्र, चॅनल्स, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं''
माध्यमांमध्ये सरकारविरोधी बातम्या येत नाहीत, असं म्हणत राज ठाकरेंनी माध्यमांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वृत्तपत्र, चॅनल्स, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं आहे, असा आरोपही राज ठाकरेंनी केला.
''मोदी आणि अमित शाह यांच्या सांगण्यावरुन कित्येक वृत्तपत्र आणि चॅनल्समध्ये पत्रकारांना, संपादकांना काढून टाकण्यात आलं. श्रीदेवीची बातमी मीडिया दाखवते, मात्र न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची बातमी का दाखवली नाही,'' असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
अक्षय कुमारवर निशाणा
''पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेम कथा हे सिनेमे सरकार स्पॉन्सर करतंय, हे काम करायला अक्षय कुमार आहे. अक्षय कुमार आजच्या काळातला मनोज कुमार आहे. सरकारच्या सिनेमांमध्ये काम करतोय. भारत, भारत चालू आहे, पण अक्षय कुमार स्वतःच भारताचा नागरिक नाही. त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे,'' असं म्हणत राज ठाकरेंनी अक्षय कुमारवरही निशाणा साधला.
''...तर नोटाबंदी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा असेल''
''सत्ता परिवर्तन झालं आणि नोटाबंदीची चौकशी लावली तर तो 1947 नंतरचा देशातील सर्वात मोठा घोटाळा असेल,'' असं राज ठाकरे म्हणाले. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं, तर देशाची आणखी वाट लागेल, अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली.
''राम मंदिर निश्चित व्हावं, पण...''
''पुढच्या काही महिन्यांत राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात दंगली घडतील,'' तशी माहिती मला मिळाली आहे, असा दावा राज ठाकरेंनी केला. ''राम मंदिर निश्चित झालं पाहिजे. पण निवडणुकांनंतर राम मंदिर व्हावं, भाजपने राजकारणासाठी त्याचा वापर करु नये,'' असं राज ठाकरे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement