Lok Sabha Election 2024 : मिलिंद देवरा शिंदे गटाच्या वाटेवर? दावोस दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत सहभागी होण्याची शक्यता
Mumbai South Lok Sabha Constituency: काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा हे भाजप आणि शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
मुंबई : महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसमधील दक्षिण मुंबईतील एक बडा म्हणून ज्यांची ओळख आहे, ते मिलिंद देवरा चेहरा शिंदे गटाच्या (Shinde Group) वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. किंबहुना मिलिंद देवरा (Milind Deora) हे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या डावोस दौऱ्यात देखील सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा पुन्हा एकदा ठाकरे गटालाच मिळणार असल्याची बाब लक्षात येताच आता काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या. एबीपी माझाला मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार पुढील 4 दिवसांत मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील.
दक्षिण मुंबईत लोकसभा मतदारसंघाची सद्य स्थिती नेमकी काय आहे?
दक्षिण मुंबईत एकूण सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत. यामधील महाविकास आघाडीकडे 3 तर महायुतीकडे 3 मतदारसंघ आहेत. यामध्ये वरळीतून आदित्य ठाकरे, शिवडी अजय चौधरी आणि मुंबाईदेवी मतदारसंघात अमिन पटेल आमदार आहेत. महायुतीकडून भायखळा मतदारसंघात यामिनी जाधव, कुलाबा राहुल नार्वेकर तर मलबारहिल येथे मंगलप्रभात लोढा आमदार आहेत. सध्या मराठी पट्ट्यात अजूनही ठाकरेंनाच मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पण यामध्ये मनसेने त्यांचा उमेदवार दिल्यास समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत.
अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित?
एकिकडे चार दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी माध्यमांशी बोलताना दक्षिण मुंबईची जागा परंपरेने काँग्रेस लढत असल्याने ती काँग्रेसकडेच राहिल असं वक्तव्य केलं. परंतु त्यानंतर अवघ्या काही दिवसांत आता देवरा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. कारण या मतदारसंघातून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चिच मानन्यात येत आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनाला फायदा होणार?
मिलिंद देवरा यांना सोबत घेतल्यानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नक्कीच फायदा होईल. सध्या शिंदेकडे दिल्लीत विशेष असा चेहरा नाही. मिलिंद देवरांच्या निमित्ताने दिल्लीच्या वर्तुळात आणखी जम बसवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना फायदा होणार आहे. याचसाठी मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्र श्रीकांत शिंदे देवरा यांना सोबत घेण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे.
मिलिंद देवरा यांना गळाला लावून जरी एकनाथ शिंदे आपल्या पदरात दक्षिण मुंबईची जागा पाडून घेऊ इच्छित असले तरी याला भाजपचा विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या ठिकाणाहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. दुसरीकडे मंगलप्रभात लोढा देखील लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना भाजप वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.