(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MHADA Lottery 2022 : मुंबईत घर घेणाऱ्यांना म्हाडाची खुशखबर, दिवाळीत 3000 घरांची सोडत
MHADA Lottery 2022 : मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. दिवाळीत म्हाडाच्या तीन हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.
MHADA Lottery 2022 : मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. दिवाळीत म्हाडाच्या तीन हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. त्यापैकी एक हजार 776 घरं पहाडी गोरेगावमध्ये असणार आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली. मुंबईतल्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळं या शहरात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांना धूसर वाटतं. पण म्हाडाच्या गृहप्रकल्प योजनेत सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होऊ शकतं.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ट्विटरवरुन दिवाळीत म्हडाच्या घराची सोडत निघणार असल्याची घोषणा केली. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'पहाडी गोरेगाव,मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील. यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल'
पहाडी गोरेगाव,मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 2, 2022
दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल #विकास_गतिमान_विभाग_गृहनिर्माण pic.twitter.com/JzbzPV8u3L
म्हाडा सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत बदल -
नुकतेच म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत बदल करण्यात आले आहेत. अत्यल्प गटासाठी आता वार्षिक 6 लाख तर अल्प गटासाठी 6 लाख ते 9 लाख रुपये, मध्यम गटासाठी 9 ते 12 आणि उच्च गटासाठी 12 ते 18 रुपये अशी मर्यादा करण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाने बुधवारी (25 मे) या संबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तसंच 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना ही उत्पन्न मर्यादा लागू असणार आहे.
नव्या बदलानुसार प्रत्येक गटासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती?
अत्यल्प गट - वार्षिक 6,00,000 रुपये
अल्प गट - वार्षिक 6,00,001 ते 9,00,00 रुपये
मध्यम गट - वार्षिक 9,00,001 ते 12,00,000 रुपये
उच्च गट - वार्षिक 12,00,001 ते 18,00,000 रुपये
घरांच्या क्षेत्रफळातही बदल
दरम्यान उत्पन्न गटानुसार सोडतीतील घरांच्या अनुज्ञेय क्षेत्रफळातही बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार आता अत्यल्प गटातील घरांसाठी 30 चौ.मी., अल्प गटातील घरांसाठी 60 चौ.मी.पर्यंत, मध्यम गटातील घरांसाठी 160 चौ.मी. आणि उच्च गटासाठी 200 चौ.मी. असं क्षेत्रफळ यापुढे लागू असेल.