Mhada lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या 2000 घरांसाठी लॉटरी, पगार कमी असला तरी लहान तोंडी मोठा घास घ्यायची संधी
Mumbai News: सर्वसामान्यांचं मुंबईत हक्काचं घर विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार. म्हाडाकडून मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी. मुंबई उपनगरात मोक्याच्या ठिकाणी कमी पैशांमध्ये स्वत:चं घर विकत घेण्याची संधी.
मुंबई: मायानगरी मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येक मुंबईकराचे स्वप्न असते. मात्र, मुंबईत जमिनीला सोन्याचा भाव असल्यामुळे प्रत्येकालाच हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. मात्र, आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईतील प्राईम लोकेशन्स म्हणून गणल्या जाणाऱ्या परिसरात परवडणाऱ्या दरात घर विकत घेण्याची संधी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात MHADA ने उपलब्ध करुन दिली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीचा कार्यक्रम म्हाडाने बुधवारी अधिकृतपणे जाहीर केला. शुक्रवारपासून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर 13 सप्टेंबरला म्हाडाच्या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाईल. म्हाडाच्या या लॉटरीत मुंबईतील तब्बल 2000 घरांचा समावेश असल्याने मुंबईकरांसाठी चांगली संधी चालून आली आहे. https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर या लॉटरीबाबत सर्व माहिती जाणून घेता येईल.
म्हाडाची घरे मुंबईतील कोणत्या भागात?
म्हाडाकडून ज्या 2030 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं उपलब्ध आहेत. मुंबई उपनगरातील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड याठिकाणी म्हाडाची घरे आहेत. म्हाडाच्या लॉटरीसाठी नेहमीप्रमाणे अत्यल्प (6 लाख), अल्प (9 लाख), मध्यम (12 लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे 12 लाखांपेक्षा अधिक असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आले आहेत.
मध्यमवर्गीयांना लहान तोंडी मोठा घास घेण्याची संधी
मुंबईतील म्हाडाची घरं विकत घेणाऱ्यांचे वार्षिक उत्पन्नानुसार गट करण्यात आले आहेत. मात्र, एखाद्या व्यक्तीला त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या गटातील घर विकत घ्यायचे असेल तर तशीही संधी म्हाडाने उपलब्ध करुन दिली आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मात्र, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. त्यांना मध्यम, अल्प किंवा अत्यल्प गटातील घर विकत घेता येणार नाही.
म्हाडाच्या अर्जाची किंमत किती?
अर्ज शुल्क ₹ ५००/- + जीएसटी @ १८% ₹९०/- एकूण ₹ ५९०/- अर्ज शुल्क विना परतावा
आणखी वाचा