Mhada Lottery 2023 Mumbai : मुंबईत घराचे स्वप्न साकार होणार! दादर, वडाळा, गोरेगावमधील घरांच्या सोडतीसाठी 22 मे पासून अर्ज भरा
Mhada Lottery 2023 Mumbai : म्हाडाकडून 4083 घरांसाठी 22 मे पासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Mhada Lottery 2023 Mumbai : म्हाडाच्या (Mhada) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी 4083 घरांची सोडत जाहीर (Mhada Lottery 2023) केली आहे. या सोडतीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 22 मे पासून सुरुवात होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. तसेच 22 मे पासून हे अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर दुपारी तीन वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत. तसेच या अर्जांची सोडत 18 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. म्हाडाची ही घरं गोरेगाव पहाडी, विक्रोळीच्या कन्नमवारनगर, अँटॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर, सायन परळ, ताडदेवमध्ये आहेत.
तसेच या सर्व घरांसाठीची माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर म्हणजेच https://housing.mhada.gov.in आणि https://www.mhada.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना या घरांसाठी अर्ज भरायचे आहेत त्यांनी या संकेतस्थळांवर जाऊन सविस्तर माहिती पहावी असे आवाहन म्हाडाकरुन करण्यात आले आहे. म्हाडाची यंदा होणारी सोडत ही संगणकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी म्हाडाने म्हाडाने आपल्या संगणकीय सोडत प्रणालीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महत्वपूर्ण बदल केले आहेत. ही संगणकीय सोडत म्हाडाकडून पारदर्शक, सोपी, सुलभ आणि सुरक्षित करण्यात आली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची मागील एक वर्षापासून चर्चा सुरु होती. परंतु काही कारणांमुळे सोडतीला उशीर झाला. मुंबई मंडळातील घरांसाठी शेवटची सोडत 2019 मध्ये काढण्यात आली होती. यात केवळ 217 घरांचा समावेश होता. अखेर मंडळाने आता 4 हजार 83 घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार सोमवार 22 मे पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याचं म्हडाकडून सांगितलं जात आहे.
एकूण 4083 घरांसाठी सोडत
म्हाडाने एकूण 4083 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2790 आणि अल्प उत्पन्न गटासाठी 1034 घरांची सोडत निघणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता (EWS) वार्षिक सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आवश्यक आहे. तर अल्प उत्पन्न गटाकरिता (LIG) वार्षिक नऊ लाख रुपयापर्यंत उत्पन्न आवश्यक आहे. दरम्यान गोरेगाव पहाडी परिसरातील पंतप्रधान आवास योजनेतील अत्यल्प गटातील 1947 घरांची किंमती प्रत्येकी अडीच लाखांचे अनुदान वजा करुन 30 लाख 44 हजार ते 40 लाख रुपयांपर्यंत आहेत.