Mhada Lottery 2023 : अखेर म्हाडाला 'मुहूर्त' सापडला! 4082 घरांसाठी या दिवशी सोडत निघणार
Mhada Lottery 2023 : मुंबईतील घरांसाठी अर्ज दाखल केल्यानंतर आता सोडतीची प्रतीक्षा संपली आहे. म्हाडाच्या घरांसाठीची लॉटरीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या (Mhada) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या 4082 घरांच्या विक्रीसाठी अखेर तारीख (Mhada Lottery Date) निश्चित करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात, 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता सोडत काढण्यात येणार आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे यांनी या सोडतीबाबत ही माहिती दिली. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आज आयोजित आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सावे बोलत होते. मुंबई मंडळाच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एक लाख 20 हजार 144 पात्र अर्जाची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.
सदनिका विक्रीची सोडत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
मंत्री झाल्यानंतर सावे पहिल्यांदा म्हाडा कार्यालयात
गृहनिर्माण मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अतुल सावे यांनी पहिल्यांदाच म्हाडा कार्यालयास आज भेट दिली. म्हाडा भवनात झालेल्या बैठकीत सावे यांनी म्हाडाच्या कामकाजाचा, प्रकल्पांचा आढावा घेतला. यामध्ये गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीचे नियोजन, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प आदी प्रकल्पांचा समावेश होता. सावे म्हणाले की, गृहनिर्मिती क्षेत्रातील वाढत्या मागणीची पूर्तता करणे अवघड असले तरी अशक्य नाही. पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून अधिकाधिक घरांची निर्मिती होऊ शकते. याकरिता पुनर्विकास प्रकल्पांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायदे आणि नियमावलीमध्ये बदल करण्यासंदर्भात शासनातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
कोणत्या गटासाठी किती अर्ज
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सोडतीत जाहीर 4082 सदनिकांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1947 सदनिकांचा समावेश आहे. प्रधान मंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता 22,472 अर्ज प्राप्त झाले आहेत.
अत्यल्प उत्पन्न गटातील 843 सदनिकांसाठी 28 हजार 862 अर्ज प्राप्त झाले आहेत. या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी (415) या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटातील 1034 सदनिकांसाठी 60 हजार 522 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगाव (416) या योजनेकरिता आहेत आहेत. तर मध्यम उत्पन्न गटातील 138 सदनिकांसाठी 8395 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत. उच्च उत्पन्न गटातील 120 सदनिकांसाठी 2068 अर्ज प्राप्त झाले आहेत. या गटातील सर्वाधिक अर्ज शिंपोली कांदीवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता आहेत.