मिरा रोडमध्ये चक्क मराठी माणूस नॉट अलावूड! मराठी माणसांमध्ये संतापाचं वातावरण
मराठी माणसालाच घर नाकारल्याची घटना मुंबई जवळच्या मिरा रोडमध्ये घडली आहे. यामुळे मराठी माणसांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
वसई : महाराष्ट्रात चक्क मराठी माणसालाच घर नाकारल्याची घटना मुंबई जवळच्या मिरा रोडमध्ये घडली आहे. घर विकण्याची एक जाहिरात सोशल मीडियावर टाकण्यात आली होती. मात्र, त्यावर घर फक्त गुजराती, मारवाडी, जैन धर्मांच्या लोकांनाच विक्री केलं जाईल असं लिहलं होतं. तर मोबाईलवरही स्पष्ट शब्दात सोसायटी मध्ये मराठी, मुस्लिम, ख्रिश्चन लोकांना रूम विकत नसल्याचं सांगितलं गेलं. घर नाकारण्याविरोधात आणि जाहिरात टाकणाऱ्याविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, मुंबईच्या वेशीवरील मिरा रोडमध्ये चक्क मराठी माणूस नॉट अलावूडमुळे मिरा भाईंदरमध्ये संतापाच वातावरण निर्माण झालं आहे.
महाराष्ट्रात मराठी माणसालाच घर नाकारण्यात येत आहे. तशी जाहिरातही सोशल मीडिआवर टाकण्यात आली होती. मिरारोडच्या हाटकेश परिसरात राहणारे गोवर्धन देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून स्वतःकरता घर विकत घेण्यासाठी घराच्या शोधत होते. त्यांच्या फेसबुक पेजवर मिरारोडच्या शांती नगर परिसरात 1 बीएचके घर रिकामे असून, ते विकायचे आहे अशी जाहिरात आली होती. मात्र, त्या जहिरातीसोबत खाली एक महत्त्वाची सूचनाही लिहण्यात आली होती. ती म्हणजे “घर फक्त गुजराती, मारवाडी, जैन धर्माच्या लोकांनाच विकलं जाईल”
शांती नगर परिसरात घर घेण्याची देशमुख यांची ईच्छा असल्याने त्यांनी जाहिरातीत असलेल्या क्रमांकावर फोन केला. फोन राहुल देढिया या व्यक्तिने उचलला व घराबद्दल विचारलं असता त्यांनीही सांगितले की, आमच्या सोसायटीमध्ये मराठी, मुस्लिम, ख्रिशन लोकांना रूम विकत नाहीत. सोसायटीच्या नियमांप्रमाणे फक्त गुजराती, मारवाडी, जैन धर्माच्या लोकांनाच रूम विकत घेण्याची परवानगी आहे. अखेर देशमुख यांनी मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या मराठी द्वेष्ट्यांवर कलम 153(अ )अंतर्गत राहुल देढिया आणि रिंकु देढिया यांच्यावर मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अजून पोलिसांनी कुणालाही अटक केली नाही. देशमुख हे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्षही आहे. त्यांनी आता “मराठी माणूस नॉट अलावूड" म्हणणाऱ्या सर्वांवर यापुढे सर्वत्र गुन्हे दाखल केलं जाईल असा इशाराच दिला आहे.