मुंबई महापालिकेने नोकरी नाकारलेल्या शिक्षकांच्या समर्थनात मराठी एकीकरण समिती रस्त्यावर; आंदोलनाचा इशारा
मुंबई महापालिकेने नोकरी नाकारलेल्या शिक्षकांच्या समर्थनात मराठी एकीकरण समिती रस्त्यावर उतरली आहे. शिक्षकांना नोकऱ्या द्या, अन्यथा आंदोलन सुरु करू असा इशाराही मराठा एकीकरण समितीने दिला आहे.
मुंबई : आझाद मैदानात मागील 21 दिवसांपासून मुंबई महापालिकेत नोकरी मिळावी या मागणीसाठी काही शिक्षक आंदोलन करत आहेत. या शिक्षकांना आता मराठी एकीकरण समितीने देखील पाठींबा दिला आहे. याबाबत बोलताना मराठी एकीकरण समितीचे दक्षिण मुंबईचे अध्यक्ष सचिन दाभोळकर म्हणाले की, "या शिक्षकांचे म्हणणे आहे की त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत मराठीत झाल्यामुळे त्यांना पालिकेने नोकरी नाकारली आहे."
सचिन दाभोळकर पुढे बोलताना म्हणाले की, "जवळपास दीडशे विद्यार्थ्यांच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेकडून हा अन्याय करण्यात आलेला आहे. ज्यावेळेस शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली. त्यावेळी जाहिरातीमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषेत शिक्षण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकणार नाहीत. अशा प्रकारची कोणतीही माहिती अर्जामध्ये नमूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आम्ही इंग्रजी भाषेतून डीएड केलेले विद्यार्थी या जागांसाठी पात्र आहोत हे समजून आम्ही अर्ज केले. यानंतर परीक्षा दिली त्यामध्ये पास देखील झालो. त्यानंतर महापालिकेकडून रिकमेंडेशन लेटर देखील पाठवण्यात आलं आणि ज्या वेळी नियुक्ती पत्र देण्याची वेळ आली. त्यावेळेस मात्र महापालिकेने आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. कारण तुमचं शिक्षण दहावीपर्यंत मराठी भाषेत झालेला आहे. अशा पद्धतीची उत्तरे दिली. एकीकडे मराठी भाषा जगली पाहिजे असं म्हणणारे सरकार दुसरीकडे मराठी भाषेचीच गळचेपी करत आहे. आमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी आहे की, त्यांनी याप्रकरणात लक्ष घालून आम्हांला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा मराठी एकीकरण समिती आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही."
आंदोलनाबाबत बोलताना शिक्षक म्हणाले की, "2017 मध्ये मुंबई महापालिकेने भरती प्रक्रिया जाहीर केली. त्या भरती प्रक्रियेच्या जाहिरातीत दहावीपर्यंत मराठीतून शिक्षण आणि त्यानंतर इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले विद्यार्थी या पदांसाठी पात्र नाहीत अशा पद्धतीची कोणतीही महिती लिहिण्यात आली नव्हती. त्यामुळे आम्ही दहावी मराठी माध्यमातून आणि इतर शिक्षण डीएडसह इंग्रजी माध्यमातून केलेल्या उमेदवारांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षक पदासाठी अर्ज केले. विशेष बाब म्हणजे महापालिकेकडून आम्हांला मुंबईतील विविध पालिकेच्या शाळांमध्ये रिकमेंड देखील करण्यात आलं. परंतु ज्यावेळी कागदपत्रांची पडताळणी पार पडली त्यावेळी मात्र पालिकेने आमच्या निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला आणि आम्हांला नोकरी नाकारली." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आमचा महापालिकेला सवाल आहे की, आजपर्यंत मराठीतून शिक्षण झालेल्या व्यक्ती मोठ्या पदांवर पोहचू शकल्या नाहीत का? थोर शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर देखील मराठी भाषेतून शिकले होते. तरी देखील त्यांना कुठेही अडचण आली नाही. मग मराठी भाषेतून दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या शिक्षकांचा तुम्हाला काय त्रास आहे. आमची परिस्थिती असती तर आम्ही लहानपणापासूनच इंग्रजी भाषेत शिकलो असतो. एककीडे मराठी वाचवा असं म्हणायचं आणि दुसरीकडे मराठी भाषेचीच गळचेपी करायची अशी दुटप्पी भूमिका महापालिका प्रशासन घेत आहे. आमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, त्यांनी तत्काळ आमचा प्रश सोडवावा."