(Source: Poll of Polls)
विशेष अधिवेशानापूर्वीच मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला; मुंबईत आंदोलनाला सुरवात
Maratha Reservation : ओबीसी नेते प्रकाश शेंडगे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सीएसएमटी ते मेट्रो सिनेमादरम्यान पाहायला मिळतोय.
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले असून, थोड्याच वेळात अधिवेशनाला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे. असे असतानाच दुसरीकडे मुंबईतील (Mumbai) सीएसएमटी परिसरात कुणबी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन केले जात आहे. "विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आज होत असतांना, यामध्ये मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता निर्णय घेण्याची मागणी कुणबी एकीकरण समितीने केली आहे. या कुणबी एकीकरण समितीमध्ये कुणबी समाजाच्या एकूण 65 संघटनांचे प्रतिनिधी एकत्रित आले आहेत.
मराठा आरक्षणाबाबत आज विशेष अधिवेशन पार पडत आहे. तर, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे, कुणबी एकीकरण समिती आक्रमक झाली असून, मुंबईतील सीएसएमटी परिसरात कुणबी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन केले जात आहे. "ओबीसीमधून कुठल्याही प्रकारे आरक्षण दिलं जाऊ नये ही प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन केले जात आहे. विशेष म्हणजे यावेळी सीएसएमटी ते विधानभवन असा मोर्चा काढला जाणार आहे. तर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सीएसएमटी ते मेट्रो सिनेमादरम्यान पाहायला मिळतोय.
दहा टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही : प्रकाश शेंडगे
दरम्यान यावेळी बोलतांना प्रकाश शेंडगे म्हणाले की, “आमची एवढीच मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत. जे खरे कुणबी आहे त्यांनी हा मोर्चा काढला आहे. जे कुणबी नाही त्यांना प्रमाणपत्र दिले जाते आणि त्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं जातंय याला आमचा विरोध आहे. जरांगे पाटील यांची मागणी पूर्णपणे चुकीची आहे. आमचा पूर्णपणे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायला विरोध आहे. जर तुम्ही स्वातंत्र्य दहा टक्के आरक्षण देण्याचा विचार केला आहे, तर ते दहा टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही. बोगस कुणबींना प्रमाणपत्र देऊ नका त्यामुळे आमचा हा मोर्चा असल्याचे" प्रकाश शेंडगे म्हणाले.
मनोज जरांगे ओबीसी आरक्षणावर ठाम...
एकीकडे ओबीसी नेत्यांकडून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी विरोध असतानाच, तिकडे मनोज जरांगे मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यापूर्वी देखील मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आले होते, मात्र ते आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे पुन्हा असेच झाल्यावर मराठा समाजाच्या मुलांचे नुकसान होईल. त्यामुळे सगेसोयरे अध्यादेशाप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. असे न झाल्यास उद्या पुढील आंदोलनाची घोषणा केली जाणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
ज्या अहवालावरुन मराठ्यांना 10 टक्के आरक्षण, त्या मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष काय?