Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आंदोलनात समाजकंटकांची घुसखोरी, आंदोलन बदनाम करण्याचा कट; सकल मराठा समाजाचा आरोप
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं पाच दिवसांपासून आझाद मैदानात उपोषण सुरु आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी, मुंबई महापालिका परिसरासह दक्षिण मुंबईत मोठ्या संख्येने आंदोलक दाखल झाले आहेत. काही आंदोलकांकडून हुल्लडबाजी करण्यात आल्याचा प्रकार गेल्या तीन ते चार दिवसांपासून उघडकीस येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील मराठा आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. मात्र आता सकल मराठा समाजाकडून (Sakal Maratha Samaj) गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाचा आरोप
मुंबईत सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनात समाजकंटक घुसल्याचा आरोप सकल मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. आंदोलनात घुसून हुल्लडबाजी करत आंदोलन बदनाम केले जात असल्याचा दावा देखील सकल मराठा समाजाने केला आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी राज्यपालांच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, मराठा समाजाचे प्रतिनिधी लवकरच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशीच्या मागणीचे निवेदन सादर करणार आहेत.
मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
दरम्यान, मुंबईत सुरू असलेलं मराठा आंदोलन हाताबाहेर जात असल्याने, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज 2 सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे, शहराचे छावणीसदृश वातावरण झाले आहे. त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. आझाद मैदान सोडून सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढा, असे कोर्टाने म्हटले आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
आणखी वाचा























