मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, परवानगी नाकारतचा मनोज जरांगेंचा पवित्रा
पुणे: मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)आझाद मैदानातील (Azad Maidan)उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर, मनोज जरांगे (Manoj Jarange)यांनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली.
पुणे: मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)आझाद मैदानातील (Azad Maidan)उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर, मनोज जरांगे (Manoj Jarange)यांनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली. कोण म्हणलं नाकारली, परवानगी दिलीय. न्यायालयाने दिलीय, आमचे वकील बांधवही कोर्टात चाललेत, असं मनोज जरांगे म्हणाले. मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला.दरम्यान, मुंबई पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली आहे, पण जरांगे पाटील यांनी निर्णय घेतला आहे, आम्ही मुंबईकडे जात आहोत, असं जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. मनोज जरांगे हे कोणत्याही नोटीसला किंवा कारवाईला घाबरत नाहीत, असंही ते म्हणाले.
आझाद मैदानाची क्षमता कमी असल्याने या मैदानात परवानगी देता येणार नाही. त्याऐवजी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे,असं मुंबई पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
आम्ही आतापर्यंत लोणावळ्यात थांबलो आहोत. कारण आम्हाला मार्ग काढायचा आहे, पण आम्हाला आरक्षण हवं आहे. कुठेही मार्ग निघो म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. आम्हाला आरक्षण मिळणार आहे, मिळाल्यावर गावाकडे जाऊ. आम्हाला तिकडे मुंबईत जाण्याची हौस नाही. पण मराठा समाजाला आरक्षण हवं. दीड दिवसापूर्वी तेच सांगितलं, आठ दिवसापूर्वी तेच सांगितलं. पण तुम्ही शिष्टमंडळ पाठवा किंवा काहीही चर्चा करा, पण आम्हाला आरक्षण हवंच आहे. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, आम्ही तोपर्यंत मुंबईकडे जातो.
आम्हाला तोडगा काढायचाय -
मला विनंती करायची आहे, आम्हाला तोडगा काढायचा आहे, आम्ही मजा करायला मुंबईला आलो नाही. मुंबईकरांचे आणि आमचेही हाल होऊ नयेत. त्यामुळे तोडगा काढा. माझ्या समाजाच्या वतीने माझी विनंती आहे, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजितदादा या तिघांनी चर्चा करावी, लगेच तोडगा काढावा. जुनं नवं शिष्टमंडळ येतं पण तोडगा निघत नाही. तिघापैकी एकाने येऊन तोडगा काढून जावं, असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांना नोटीस
दरम्यान, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे. तसेच, मराठा आंदोलनामुळे विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही, त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहेत.
आझाद मैदानात नारळ फुटला
एकीकडे आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तयारी सुरु केली आहे. मनोज जरांगे हे उद्या 26 जानेवारीला आझाद मैदानात दाखल होत आहेत. "आम्ही यापूर्वीच पत्रव्यवहार केला होता. आझाद मैदानाची परवानगी आधीच मागितली होती.आम्ही स्टेज बांधण्याचं काम सुरु केलं आहे. उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनही याच मैदानात करु" असं वीरेंद्र पवार यांनी एबीपी माझाला सांगितलं.
आणखी वाचा :
मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली, मुंबई पोलिसांनी काय कारणं दिलं?