मकरसंक्रांत निष्पाप पक्ष्यांच्या जीवावर बेतली, मुंबईत मांज्यामुळे 800 पक्षी जखमी
पतंगाचा मांजा अनेकवेळा झाडांसह तारांमध्ये अडकतो. हाच अडकलेला मांजा पक्ष्यांसह मनुष्यालाही हानिकारक असतो ज्यामुळे असे अपघात होतात.
मुंबई: मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) निमित्ताने मुंबईत (Mumbai News) मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी झाली. मकरसंक्रांतीनिमित्त रविवारसह सोमवारी पतंग उडविण्यासाठी वापरण्यात आलेल्या धारदार मांजामुळे (Nylon Manja) 800 पक्षी जखमी झाले आहेत. चर्चगेटपासून विरारपर्यंत घडलेल्या घटनांतील जखमी पक्ष्यांचा हा आकडा आहे. दहिसर, कांदिवली, मालाड, बोरीवली पट्ट्यात अधिक पक्षी जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने इमारतीच्या गच्च्या, मैदाने, मोकळ्या जागांवर पतंगबाजी रंगली आहे. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात आलेला मांजा हा अनेक पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरला आहे. धारदार मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी रविवारी व सोमवारी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पतंगाचा मांजा अनेकवेळा झाडांसह तारांमध्ये अडकतो. हाच अडकलेला मांजा पक्ष्यांसह मनुष्यालाही हानिकारक असतो ज्यामुळे असे अपघात होतात. दरम्यान मुंबईच्या लोअर परळ येथीलबाई सक्करबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल येते अनेक जखमी पक्षांना काल दाखल करण्यात आले आहे.
मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
मांजा जीवावर बेतत असल्याने नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. राज्याचे शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना असे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच नायलॉन मांजाबाबत विद्यार्थ्यांना साक्षर करण्यासाठी तीन आठवड्यात काय पावले उचललीत याबाबत प्रधान सचिवांनी माहिती द्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत मांजाने गळा कापून 21 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू
मांजाने गळा कापून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. बोरिवली येथील कोरा केंद्र उड्डाण पुलावर ही घटना घडली आहे. मांजाने गळा कापून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद फारुकी असे तरूणाचे नाव आहे. दुचाकीवरून जात असताना मांजाने गळा कापला गेला. बोरिवली पोलिसांनी पतंग उडवणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.
नायलॉन मांजा टाळा, तक्रार करा
जर कुणी नायलॉन मांजाचा वापर करीत असेल किंवा नायलॉन मांजाचा उपयोग करीत असेल तर थेट पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज पोलीस विभागाने तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यावर विक्री आणि वापराबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
कुणाचा गळा, कुणाचा बोट...; नायलॉन मांजाने संभाजीनगरसह नागपूर जिल्ह्यात 90 जखमी, पतंग पकडतांना एकाच मृत्यू