लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील हवेच्या प्रदूषणाच्या पातळीत मोठी घट
वायू वैविध्य सर्वेक्षण आणि संशोधन प्रयोगशाळेच्या माध्यमातून तसेच सफर-मुंबई या प्रदूषण मोजणाऱ्या प्रणालीच्या माध्यमातून ही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.
मुंबई : लॉकडाऊन काळात मुंबईतील हवेच्या प्रदूषणाच्या पातळीत मोठी घट दिसून आली. मुंबई महापालिका यंत्रणेकडे उपलब्ध नोंदींच्या आधारे जानेवारी ते मे महिन्यातील हवा प्रदूषण अहवाल आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या अहवालानुसार मे मध्ये मार्च आणि एप्रिलपेक्षाही प्रदूषण पातळीत मोठी घट आढळून आली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उद्योगजगताने पर्यावरणपूरक बदल घडवून आणण्याचे आवाहन या अहवालात करण्यात आले आहे. हवा प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या पीएम 2.5, पीएम 10, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड यांची पातळी महापालिकेतर्फे मोजण्यात आली आहे.
वायू वैविध्य सर्वेक्षण आणि संशोधन प्रयोगशाळेच्या माध्यमातून तसेच सफर-मुंबई या प्रदूषण मोजणाऱ्या प्रणालीच्या माध्यमातून ही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. वायू सर्वेक्षण प्रयोगशाळेच्या अखत्यारीत तीन ठिकाणी वायू सर्वेक्षण केंद्र असून, चार वाहन आधारित (मोबाइल व्हॅन) सर्वेक्षण केंद्र आहेत. तसेच सफरची नऊ स्वयंचलित हवेची गुणवत्ता मोजणारी केंद्रे मुंबईत आहेत.
यामध्ये चेंबूर केंद्रावरील प्रदूषणाच्या पातळीची नोंदणी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये झालेली नाही. मात्र जानेवारी आणि फेब्रुवारीत बीकेसी, अंधेरी, मालाड येथे पीएम 10 ची पातळी सर्वाधिक होती. बीकेसीला जानेवारीमध्ये ती 205 होती. मात्र मे महिन्यात या सगळ्याच ठिकाणी हा निर्देशांक 50 हून कमी नोंदवला आहे. बोरिवलीमध्ये मात्र मे महिन्याचा सरासरी निर्देशांक 68 आहे. पीएम 2.5 चा गुणवत्ता निर्देशांकही एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात अधिक खाली असल्याचे समोर आले आहे.
हा निर्देशांक भांडुप आणि कुलाबा वगळता इतर ठिकाणी जानेवारीमध्ये 50 च्या वर होता. मे मध्ये हा निर्देशांक मालाड वगळता इतर ठिकाणी 25 हून खाली आहे. मालाड येथेही हा निर्देशांक 36 आहे. कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण मालाड आणि वरळी येथे मे मध्ये वाढल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण दैनंदिन निर्देशांकाहूनही अधिक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. इतर ठिकाणी मात्र हे प्रमाण तुलनेने दैनंदिन निर्देशांकापेक्षा कमी आहे.
नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाणही लॉकडाउनच्या काळात कमी झाले आहे. माझगावमध्ये हा फरक लक्षणीय आहे. माझगावला जानेवारीमध्ये 69 तर फेब्रुवारीमध्ये 75 निर्देशांक नोंदवण्यात आला होता. मात्र मेमध्ये हे प्रमाण 11 इतके नोंदवले गेले. जानेवारीत सर्वच केंद्रांवर प्रदूषणाचा गुणवत्ता निर्देशांक वाईट किंवा अती वाईट होता. मात्र,हा स्तर 23 मार्च ते 31 मे या काळात समाधानकारक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.