नायट्रोजन प्लँट्समधून ऑक्सिजन निर्मिती करण्याची कल्पना कशी सुचली? सांगतायेत ज्येष्ठ संशोधक डॉ. मिलिंद अत्रे
मुंबई आयआयटी संस्थेतील ज्येष्ठ संशोधक डॉ. मिलिंद अत्रे यांनी नायट्रोजन प्लँट्समधून ऑक्सिजन निर्मिती करण्यावर संशोधन केलं आहे. आज डॉ. मिलिंद अत्रे माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मुंबई : कोरोना महामारीमुळे राज्यासह देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही येत आहे. हे सगळं पाहून आपल्या पीएसए (PSA) युनिटमधून ऑक्सिजन निर्मितीची डोक्यात कल्पना आली. यावर प्रयोग केल्यानंतर यशस्वीरित्या ऑक्सिजनची निर्मिती झाल्याची माहिती मुंबई आयआयटीतील ज्येष्ठ संशोधक डॉ. मिलिंद अत्रे यांनी दिली. माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते.
संशोधक डॉ. मिलिंद अत्रे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, की सध्या आपण ऑक्सिजन दोन पद्धतीने मिळवला जातो. एक म्हणजे क्रायोजेनिक प्रोसेस आहे, जी सर्व स्टिल प्लांटमध्ये वापरली जाते. यात हवेला लिक्वीफाय केलं जातं. यात हवेतून ऑक्सिजन आणि नायट्रोजन वेगळे करण्यात येतात. ही प्रोसस खूप कमी तापमानात केली जाते. यासाठी मायनस -176 तापमानाची आवश्यकता लागते. दुसरी पद्धत पीएस युनिट आहे, यात कमी तापमानात न जाता वातावरणात असणाऱ्या तापमानालाच ऑक्सिजन आणि नायट्रोजन वेगळं करतात. ही पद्धत वापरणे सोप्प आहे.
कमी तापमानाला ऑक्सिजनची निर्मिती करणे, त्याची लिक्वीड स्वरुपात वाहतूक करणे, यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. आमच्या लॅबमध्ये आम्ही PSA युनिटच्या माध्यमातून हवेतून ऑक्सिजन आणि नायट्रोजन वेगळं करत होतो. यात आम्ही नायट्रोजन पुढे पाठवायचो आणि ऑक्सिजन बाहेर सोडून द्यायचो. सध्या देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातूनचं माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण नायट्रोजन ऐवजी ऑक्सिजन साठवू शकतो. त्याप्रमाणे आम्ही केलं आणि ऑक्सिजनचं उत्पादन सुरु झालं.
आमच्या सोबत (आयआयटी मुंबई) टाटा कन्सल्टींग इंजिनिअर्स आणि स्पेंटेक कंपनीचे सदस्यही होते. या प्रयोगाचा एक व्हिडीओ तयार करुन आम्ही सोशल मीडियावर टाकले. काही माध्यमांनीही याला प्रसिद्धी दिली. त्यानंतर आम्हाला 500 ते 1000 फोन आणि मेल्स आले की आमच्याकडेही नायट्रोजनचे प्लँट्स आहेत. या दृष्टीने आम्ही आमची हेल्पलाईन आणि ई मेल तयार केला. याच्या माध्यमातून आम्ही अशा लोकांना मार्गदर्शन केलं. यातून राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती सध्या राज्यात होत आहे. याचा फायदा सध्या कोरोना संकटाशी लढताना होत आहे.
लॉकडाऊनमुळे आमच्याकडे सध्या संशोधक विद्यार्थी कमी आहेत. मात्र, प्राध्यापक इथेच असल्याने संशोधन सुरुच आहे. मागच्या वर्षीपासून कोविडबाबतच्या संशोधनावर आम्ही जास्त फोकस करत आहे.