एमएमआर क्षेत्रातील पहिले पोस्ट कोविड सेंटर ठाण्यात!
कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेकांना फुप्फुस, किडनी आणि हृदयाचे विकार जडत आहेत, तर काहींना मानसिक आजार होत आहेत. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आता ठाण्यात पोस्ट कोविड सेंटर निर्माण करण्यात आले आहे.
ठाणे : कोविडमधून बरे झाल्यानंतर देखील अनेक रुग्णांना विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांना फुप्फुस, किडनी आणि हृदयाचे विकार जडत आहेत, तर काहींना मानसिक आजार होत आहेत. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आता ठाण्यात पोस्ट कोविड सेंटर निर्माण करण्यात आले आहे. हे मुंबई महानगर क्षेत्रातील पहिलेच पोस्ट कोविड सेंटर असल्याचा दावा ठाणे महापालिकेकडून करण्यात आला आहे. राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली या सेंटरचे उद्घाटन संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे यात केले जाणारे सर्व उपचार हे मोफत असतील आणि फक्त ठाण्यातील नाही तर आजूबाजूच्या शहरातील सर्व पोस्ट कोविड पेशंट इथे येऊन उपचार घेऊ शकतात.
लोढा लक्झोरिया कॉम्प्लेक्स, माजिवडा येथील महापालिकेने अखत्यारीत घेतलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांना जाणवणाऱ्या अनेक लक्षणांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कोरोनामुक्त रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच कोरोनाच्या काळातील कटू अनुभवातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ, समुपदेशक, फिजिओथेअरपिस्ट यांच्यासह या सेंटरमध्ये योगा सेंटर, विश्रांती कक्ष तसेच समुपदेशन सेंटर अशा सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोरोनानंतर जाणवणारा थकवा, बैचेनी, अनाहूत अस्वस्थता, लक्ष केंद्रित न होणे, लवकर काही न आठवणे अशा अनेक कारणांनी रुग्ण त्रस्त झालेले असतात. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला असतो. त्यामुळेच कोरोनानंतर आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. यासाठी या पोस्ट कोविड सेंटरमध्ये समुपदेशन केंद्र उभारण्यात आले असून मानसोपचार तज्ज्ञांच्या सुयोग्य मार्गदर्शनाने रुग्णांना मानसिकदृष्ट्या सक्षम केले जाणार आहे. कोरोनानंतर जाणवणारी लक्षणे म्हणजे कमी उत्साह आणि थकवा श्वाच्छोश्वास घेण्यास त्रास, छाती भरुन येणे, सतत येणारा खोकला, कफ पडणे, तोंडाला चव न येणे,अपचन डोकेदुखी, बैचैनी वाढणे झोप न लागणे परत कोरोना होईल याची भीती वाटणे या सर्व गोष्टीचा सामना करण्यासाठी या सेंटरमध्ये वैद्यकीय कक्ष उभारण्यात आला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत या सर्व गोष्टीवर उपचार केले जाणार आहेत.
या पोस्ट कोविड सेंटरमध्ये ये-जा करण्यासाठी ठाणे स्टेशन येथून विशेष टीएमटी बस सेवा ठेवण्यात आली आहे. सकाळी साडेसहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत दर अर्धा तासाने या सेंटरसाठी बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.