Shiv Sena MP Sanjay Raut : संजय राऊतांचं आज मुंबईत 'शक्तीप्रदर्शन'; ढोल-ताशा पथकांसह शिवसैनिक सज्ज
Maharashtra Shiv Sena MP Sanjay Raut : मुंबईत आज शिवसेनेचं जोरदार शक्तिप्रदर्शन, संजय राऊत मुंबईत आल्यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे.
Maharashtra Shiv Sena MP Sanjay Raut : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवायांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या (ED) रडारवर आहेत. त्यावरुन वारंवार विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. केंद्रात सत्ता असलेलं भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन बिगर भाजपशासित राज्यांमधील इतर पक्षांच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील नेत्यांकडून केला जात होता. यामध्ये प्रामुख्यानं एक नाव आघाडीवर होतं, ते म्हणजे संजय राऊत. दोन दिवसांपूर्वी ईडीनं संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली. ईडीनं संपत्ती जप्त केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत गुरुवारी, म्हणजेच आज दिल्लीहून मुंबईत येणार आहेत. यावेळी शिवसेनेकडून संजय राऊतांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. यानिमित्तानं शिवसेना जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. संजय राऊत यांचे स्वागत मुंबई विमानतळापासून ते त्यांच्या भांडुपमधल्या घरापर्यंत केलं जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांनी ईडीवर आरोपांची तोफ डागली होती. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात जाहीर पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्यांना फैलावर घेतलं होतं. किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर त्यांनी निशाणा साधला होता. तसेच, संजय राऊतांनी भाजप नेत्यांसोबतच थेट ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा घणाघाती आरोप केला होता.
खासदार संजय राऊत यांच्या आगमनाच्या निमित्तानं शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून त्यासाठी 40 बसेस, ढोल-ताशा पथक अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार, आमदार आणि काही मंत्रीही विमानतळावर उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
भाजपचे नेते किरीट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्या आणि त्यांच्या साथिदारांविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर करण्यात आला आहे. माजी सौनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जात आहे.
ईडीच्या कारवाईनंतर काय म्हणाले संजय राऊत?
ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, ईडी असो वा सीबीआय माझ्या मागे लागली आहे याची कल्पना मला होती. ईडीने केलेल्या कारवाईचं मला आश्चर्य वाटत नाही. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता. त्यांना जर मदत केली नाही तर माझ्या मागे केंद्रीय यंत्रणा लागतील अशी माहिती होती.
आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो : संजय राऊत
खासदार संजय राऊत म्हणाले की, "या देशात खोट्या केस, खोटे पुरावे कधी निर्माण झाले नव्हते, आता होत आहेत. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन. मराठी शब्दात बोलायचं झाल्यास आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो, मी शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा, मर्द मराठी माणूस आहे.. काय कराल तुम्ही. इथे बंदूक लावाल ना तुम्ही, हे ईडी सीबीआय भाडोत्री भाजपने लावलं आहे ना, या खोटेपणाला संजय राऊत घाबरत नाही."