Maharashtra Reduced VAT : राज्य सरकारकडून पेट्रोल डिझेलवर कर कमी केला तरी मुंबईत मात्र दर 'जैसे थे'च?
Maharashtra Reduced VAT : महाराष्ट्र सरकारच्या घोषणेनंतर राज्यातील जनतेला दिलासा मिळाला खरा. मात्र आज मुंबईतील पेट्रोलपंपावर परिस्थितीचा आढावा घेताच वेगळंच चित्र समोर आलं.
Maharashtra Reduced VAT : केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्र सरकारकडूनही राज्यातील जनतेला दिलासा मिळाला खरा.. मात्र आज मुंबईतील पेट्रोलपंपावर परिस्थितीचा आढावा घेताच वेगळंच चित्र समोर आलं. महाराष्ट्रात ठाकरे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईतील पेट्रोल- डिझेलचे दर कमी झाले नसल्याचे दिसून आले, त्यामुळे मुंबईकरांचा आज संताप पाहायला मिळाला
पेट्रोल डिझेलवर कर कमी केला तरी मुंबईतील दर 'जैसे थे'च ?
केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेल चे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT)अनुक्रमे 2 रुपये 80 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केल्याची घोषणा केली आहे. मात्र प्रत्यक्षात आज मुंबई मध्ये पेट्रोल पंपावर परिस्थितीचा आढावा घेताच पेट्रोल आणि डिझेलचा भाव कमी झाला नसल्याचं चित्र दिसून आलं. आज मुंबईतील पेट्रोलपंपावरील पेट्रोलचे दर पाहता 111 रूपये 39 पैसे दिसून आले, तर डिझेलचा भाव 97 रुपये 32 पैसे इतका दिसून आला. याचाच अर्थ राज्य सरकारकडून जरी जनतेला दिलासा देणारी घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्षात मात्र हे दर काही कमी झाले नसल्याचे चित्र दिसून आले. ज्यामुळे मुंबईकरांनी आज संताप व्यक्त केला.
महाराष्ट्र सरकारनं व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र अंमलबजावणी झालेली नाही.
यावर ऑल इंडिया पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे प्रवक्ते अलि दारुवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारनं व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. करात कपात करत सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी आम्ही विनंती करतोय. केंद्राने जसे मोठ्या प्रमाणात कर कमी केले तसे महाराष्ट्र सरकारनं देखील मोठी इंधन कर कपात करत सर्वांना दिलासा द्यावा अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात येतेय.
केंद्र सरकार कडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा
केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर देशात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. आता महाराष्ट्र सरकारनेही दर कमी करण्याची घोषणा केली. तेव्हा राज्य सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील वॅटमध्ये अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लीटर कपात केल्याचे सांगितले. यानुसार व्हॅट कमी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच पेट्रोल प्रतिलिटर 2 रुपये 8 पैसे कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची बातमी मिळाली. मात्र आज सकाळी मुंबईत वेगळंच चित्र दिसून आलं
राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत- अर्थमंत्री
केंद्र सरकारनं इंधनांच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री 12 वाजल्यापासून देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) लागू करण्यात आले. केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरांत घट करण्यात आल्यानंतर देशभरात पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेल (Diesel Price) स्वस्त झालं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत, असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).