(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain Live Updates : पुढील दोन दिवस विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज
पुढील दोन दिवस विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा क्षेत्रांमुळे पाऊस लांबला आहे. सप्टेंबर मध्यानंतर मान्सून प्रामुख्याने माघारी फिरत असतो मात्र यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्याने राज्यात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडात मुसळधार पावसाचा इशारा
कोकणात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज संपूर्ण कोकणासाठी यलो अलर्ट जारी, 64 मिमी ते 115 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उद्या उत्तर कोकणात मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या चारही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.