Shivsena Symbol: ठाकरे गटाचे ठरलं! पक्षासाठी तीन चिन्ह, तीन नावं निश्चित; निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष
Shivsena Symbol: शिवसेना ठाकरे गटाकडून आपल्या पक्षासाठीची तीन नावे आणि तीन चिन्हांचे पर्याय निश्चित करण्यात आले आहे.
Shivsena Symbol: निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह (Shivsena Election Symbol) धनुष्यबाण (Bow And Arrow) आणि पक्षाचे नाव गोठवल्यानंतर ठाकरे गटाकडून तीन निवडणूक चिन्ह आणि पक्षासाठी तीन नावे निश्चित करण्यात आली आहेत. ही नावे आणि निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नावे आणि चिन्हाबाबत माहिती देण्याची मुदत दिली आहे.
ठाकरे गटाचे नाव काय?
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी सुचवलेल्या नावात ठाकरे कुटुंबातील तीन पिढ्यांचे प्रतिबिंब दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून शिवेसना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नावे सुचवण्यात आली आहेत. ठाकरे गटाने आणि शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावावर दावा केला आहे. दोन्ही गटांनी केलेल्या दाव्यामुळे निवडणूक आयोगाकडून हे नावदेखील गोठवले जाण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाची चिन्हासाठी पसंती?
शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय दिले आहेत. यामध्ये त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी विनंती शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह पोहचवण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर असणार आहे.
मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक
निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर आज मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेली बैठक जवळपास दीड तास सुरू होती. या बैठकीत शिवसेना नेत्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे शिवसैनिकांना शांततेचे आवाहन करताना त्यांची समजूत काढावी असे आवाहनही ठाकरे यांनी केले असल्याचे समजते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सायंकाळी सहा वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: