Maharashtra Politics : कालपर्यंत कुठं न दिसणारे युवासेना प्रमुख आज दिसतात; शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य
Maharashtra Politics : शिवसंवाद यात्रेनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या निशाण्यावर आले आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेतृत्त्वावर टीका केली.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे गटांच्या निशाण्यावर आता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आले आहे. कालपर्यंत कुठंही न दिसणारे युवासेनेचे प्रमुख आता दिसत असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली आहे. या वेळी त्यांनी आदित्य यांचा नामोल्लेख टाळला. शिवसेनेतून (Shivsena) बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणे टाळले होते. मात्र, आता शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेनंतर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले जात असल्याचे चित्र आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे आव्हान दिले. केसरकर यांनी म्हटले की, कालपर्यंत न फिरणारे आज शिवसेनेच्या शाखा-शाखांमध्ये फिरत आहेत. युवासेनेचे एक प्रमुख आहेत, त्यांचे नाव घेणार नाही. पण, हे कालपर्यंत ते कुठे दिसत नव्हते. सातव्या मजल्यावरील आपल्या कार्यालयात किती वेळेस ते गेले. त्यांनी किती गाठी भेटी घेतल्या असा प्रश्न करताना आज तुम्ही मुंबईत दिसू लागला आहात अशी टीकाही केसरकर यांनी केली. उद्धव ठाकरे आजारी असताना कटकारस्थान झाले नाही. आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली म्हणजे कटकारस्थान नाही असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
दीपक केसरकरांनी म्हटले की, आम्ही शिवसेना नेतृत्वाला तीन प्रश्न विचारले होते. त्यांनी याबाबत कोणतेच उत्तर दिले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचे आपण आश्वासन दिले होते का? मला मुख्यमंत्री बनण्यात रस नाही, काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत युती तोडावी आणि निवडणूक पूर्व युती करा, असे शिंदे यांनी म्हटले होते का? आणि खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत युतीबाबत चर्चा सुरू होती हे केलेले वक्तव्य खरे आहे का, हे तीन प्रश्न आम्ही विचारले होते. मात्र, त्यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. आमच्या प्रश्नांना उत्तरही दिले नसल्याचे केसरकरांनी म्हटले. त्यांनी पुढे म्हटले की, आज राज्याची जी व्यक्ती मुख्यमंत्री झाली आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते का? आणि शब्द देऊनही आश्वासन का पाळले नाही असा सवाल केसरकरांनी उपस्थित केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दाला जागत होते. आश्वासन पूर्ण करत होते असे म्हणत केसरकरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
केंद्राशी संबंध बिघडवले
केंद्राशी चांगले संबंध राहिले असते तर विकासाला चालना मिळाली असती. पण रोज सकाळी नऊ टीव्हीवर येऊन केंद्रावर टीका केली गेली. त्यामुळे अनावश्यकपणे केंद्रासोबतचे संबंध बिघडले असल्याचे केसरकर यांनी सांगत संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. उद्धव ठाकरेंना आजूबाजूचे लोक भडकवतात. त्यांना बाजूला करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
घरावर मोर्चा काढण्याचा अधिकार कोणी दिला?
खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार कोणी दिला असा प्रश्नही केसरकर यांनी उपस्थित केला. घरावर मोर्चे काढणे थांबवा. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस कारवाई करतील. त्याचे परिणामही होतील असा सूचक इशाराही केसरकरांनी शिवसैनिकांना दिला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
