Ajit Pawar: टिल्ल्या लोकांनी सांगायचं कारण नाही, त्यांना पक्षाचे प्रवक्ते उत्तर देतील; अजित पवार यांचा टोला
Ajit Pawar: असल्या टिल्ल्या लोकांनी काही सांगायचे कारण नसून त्यांना प्रवक्ते उत्तर देतील असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे यांना लगावला.
Ajit Pawar: छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक असल्याचे वक्तव्य विधानसभेत केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते, आमदार यांच्याकडून टीका करण्यात येत असताना अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत आरोपांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर टीका करताना त्यांच्यावर आमच्या पक्षाचे प्रवक्ते बोलतील असे म्हटले.
संभाजीराजांच्या स्मारकासाठी मी पाठपुरावा केला आहे. मी महापुरुषांबद्दल , स्त्रियांबद्दल कधीही चुकीचा बोललो नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असे अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले. भाजपने मला विरोधी पक्ष नेते पद दिलेले नाही त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही असेही त्यांनी म्हटले.
या पत्रकार परिषदेत, भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेबाबत अजित पवार यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी अजित पवार यांनी टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही असे म्हटले. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती? असे म्हणताना त्यांच्या आरोपांना पक्षाचे प्रवक्ते उत्तर देतील असे पवार यांनी म्हटले. अशा लोकांच्या नादी आपण लागत नाही, असेही अजित पवार यांनी आपल्या शैलीत म्हटले.
राज्यात सात-आठ धर्मवीर
धर्मवीर उपाधी कोणाला मिळाली हे तुम्ही इंटरनेटवर शोधा. सात ते आठ जण 'धर्मवीर' आहेत, असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. काही धर्मवीरांचे तर चित्रपट निघाले आहेत. आता तर 'धर्मवीर पार्ट-2' येत असल्याचे त्यांनी म्हटले. स्वराज्यरक्षकाची जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली. त्यामुळे स्वराज्यरक्षक एकच असून दुसरा कोणी होऊ शकत नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले.
वंचितला विरोध नाही
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या आपल्या मित्र पक्षाला आणावे. आम्ही वंचितला विरोध केला नसल्याचेही पवार यांनी सांगितले. सगळ्या मित्र पक्षांना सोबत घ्यावे. एकत्र तीन पक्ष बसून जागा वाटप करताना त्यांच्या मित्र पक्षाला त्यांच्या जागा देतील, असेही अजित पवार म्हणाले.
पाहा व्हिडिओ: Ajit Pawar: टिल्ल्या लोकांनी सांगायचं कारण नाही, तुमची उंची किती? नितेश राणेंना टोला
इतर संबंधित बातमी: