Eknath Shinde : आनंदसेना किंवा धर्मवीर संघटना, स्वतंत्र गट स्थापून धक्का देण्याची तयारी, राजकारणातील शक्यता काय?
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार कोसळणार? भाजप काय भूमिका घेणार? देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात का? महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात काय घडू शकतं?
मुंबई : बाळासाहेबांचा खंदा शिलेदार, शिवसेनेचा कट्टर सैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या नगरविकास खात्याचे मंत्री अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टोकाचं बंड पुकारलं आहे. राज्यसभेतील शिवसेना उमेदवाराचा पराभव, विधानपरिषदेत पक्षाची फुटलेली मतं यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी थेट 20 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुजरात गाठल्याने ते भाजपला पोषक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज आहे. या परिस्थितीमुळे ठाकरे सरकार संकटात आहे. राज्याच्या राजकारणात भूकंपाचं चित्र आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार कोसळणार का? भाजप काय भूमिका घेणार? देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात का? महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात काय घडू शकतं?
राजकीय जाणकारांच्या मते, एकनाथ शिंदे हे शिवसेनेवर नाराज नाही तर महाविकास आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये असण्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे नाराज एकनाथ शिंदे आनंदसेना किंवा धर्मवीर संघटना स्थापन करुन भाजपला पोषक भूमिका घेऊ शकतात.
महाराष्ट्राच्या राजकारणातील शक्यता काय?
1) एकनाथ शिंदे 37 लोकांसोबत गट स्थापन करु शकतात. गट स्थापन करण्यासाठी एक तृतियांश म्हणजे 37 आमदारांची गरज
2) त्या गटाची आनंदसेना किंवा धर्मवीर सेना असं नाव देऊन पुढचं राजकारण करु शकतात
3) नाराजी शिवसेनेवर नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीवर आहे. या मुद्द्याला घेऊन हा गट पुढची भूमिका घेऊ शकतो
4) हा गट याच मुद्द्यावरुन भाजपला पोषक भूमिका घेऊ शकतो
5) विधानसभा अध्यक्ष किंवा बहुमत प्रस्तावावेळी हा गट अनुपस्थित राहून भाजपशी सकारात्मक भूमिका घेऊ शकतो.
6) गट स्थापन झाला नाही तर विधीमंडळ सभागृहात प्रत्यक्ष (गुप्त मतदान) करुन भाजपला मदत करु शकतात
7) एकनाथ शिंदे गट थेट भाजपात जाण्याची किंवा प्रवेश करण्याची शक्यता कमी
8) एकनाथ शिंदे यांची नाराजी शिवसेनेवर नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीवर आहे. त्यांच्यासोबत सरकार नको. या मुद्द्यावर भाजपला समर्थन देऊ शकतात.
9) उद्धव सरकार अडचणीत येऊ शकतं आणि भाजप सरकार स्थापन करु शकतं
10) मात्र अजित पवारांसोबतच्या सत्तास्थापनेच्या भूमिकेनंतर भाजप सध्या घाई करण्याच्या भूमिकेत नाही.