मुंबईच्या वरळीत घडलेल्या खुनाचा दहा तासात छडा, चार आरोपींना बेड्या
जगातील सर्वोत्तम पोलीस दल अशी मुंबई पोलिसांची ख्याती आहे. वरळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका खुनाचा छडा पोलिसांनी अवघ्या दहा तासात लावला.
मुंबई : मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. जगातील सर्वोत्तम पोलीस दल अशी मुंबई पोलिसांची ख्याती आहे. याचाच प्रत्यत पुन्हा एकदा आला. वरळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका खुनाचा छडा पोलिसांनी अवघ्या दहा तासात लावला. पहिल्या सहा तासात खुनातील पहिल्या आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर खुनाच्या दहा तासात चार आरोपींच्या मुसक्या वरळी पोलिसांनी आवळल्या.
वरळी पोलीसच्या स्टेशन हद्दीत काल (18 एप्रिल) सकाळी दहाच्या सुमारास एस के अहिरे मार्ग (खाऊ गल्ली) इथे एक इसमाचा खून झाला आहे अशी माहिती पोलिसांना खबरीमार्फत मिळाली. यानंतर वरळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता तिथे एका इसमाचा खून झाल्याचे निष्पन्न झालं. परंतु मृत व्यक्तीची कोणतीही ओळख पटवता येत नव्हती. परंतु अशा परिस्थितीतही वरळी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान चौधरी, पोलीस शिपाई स्वप्नील डेरे आणि पोलीस शिपाई स्वप्नील गुरव यांनी आपल्या कौशल्याने आणि इतर माध्यमातून सदर खुनाचा तपास सुरु केला.
चोरीच्या आरोपात संबंधित व्यक्तीला चार ते पाच जणांनी मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. या हत्येमध्ये एकूण पाच आरोपींचा सहभाग होता. सहा तासाच्या आत खुनाच्या पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली. त्यापैकी चार आरोपींना 10 तासांच्या आत पकडून खुनाचा छडा लावण्यात वरळी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना यश आलं. दरम्यान एक आरोपी अद्याप फरार असून लवकरच त्याला देखील अटक करण्यात येईल, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.