Ajit Pawar : शेतकरी अडचणीत अन् मुख्यमंत्री सत्कार सोहळे स्वीकारण्यात व्यस्त; अजित पवारांचा हल्लाबोल
Ajit Pawar : राज्यात आलेल्या पुरामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना दुसरीकडे सरकार सत्कार सोहळ्यात व्यस्त असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
Ajit Pawar : राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि पुराने शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी मुख्यमंत्री ठिकठिकाणी सत्कार स्वीकारण्यास व्यस्त असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत याबाबत कधी होणार याबाबत कोणीच सांगत नाही. पूरग्रस्त भागात केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना लोकांच्या समस्येबाबत पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकताच पूरग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यानंतर मुंबईत अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांनी सांगितले की, मराठवाड्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. परंतु अजूनही सरकारी मदत मिळालेली नाही. बीडमध्ये गोगलगायमुळे पीक गेले आहे. यामध्ये काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. सुरुवातीला काही भागात मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांनी दौरा केला. मात्र, त्यानंतर लक्ष दिलं नाही. खरंतर केंद्राच्या पाहणी पथकाला बोलवायला हवं होतं. मात्र अजूनही तसं केले नसल्याचे पवार यांनी सांगितले.
शेतकरी अडचणीत, सरकारचे सत्कार सोहळे
राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत आणि मुख्यमंत्री गावोगावी सत्कार सोहळे स्वीकारत आहेत अशी टीका अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री सध्या अनेकांना भेटत आहेत. सध्या शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे. याकडे लक्ष द्यायला हवं. तिथ लक्ष देणाऱ्या पालकमंत्र्यांच्या नेमणुका त्यांनी अजून केलेल्या नाहीत, असेही पवार यांनी सांगितले.
राज्याचा इतर भागात अतिवृष्टी झालेली आहेत. तिथं देखील मदत द्यायला हवी. सध्या पीक विम्याचा प्रश्न आहे. अजूनही त्याबाबत निर्णय झालेला नाही. शैक्षणिक शुल्क माफ करण्याची आवश्यकता आहे. मात्र, अजूनही त्यावर निर्णय घेतला गेला नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांना अधिकारच नाही
शपथविधी होऊन एक महिना झाला मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. अजूनही उपमुख्यमंत्र्यांना सह्यांचे अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक फाईल ही मुख्यमंत्र्यांकडे जात आहे. बऱ्याच फाईल अजूनही थांबलेल्या आहेत. त्यामुळे अनेक काम थांबली असून जनतेची कामे खोळंबली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.