Nitesh Rane : झेंडा हातात घेतला नाही म्हणजे देशप्रेम नाही असं कुठं लिहिलंय? नितेश राणेंकडून जय शाहांचा बचाव
Nitesh Rane : भारताचा तिरंगा हाती न घेतल्यामुळे सोशल मीडियावर जय शाह यांच्यावर टीका होत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांचा बचाव केला आहे.
Nitesh Rane : एखाद्या व्यक्तीने झेंडा हातात घेतला नाही म्हणजे त्या व्यक्तीचे देशावर प्रेम नाही असा त्याचा अर्थ होत नाही अशी प्रतिक्रिया भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी व्यक्त केली आहे. रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह (Jay Shah) यांनी भारताचा तिरंगा हाती घेण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर नितेश राणे ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
नितेश राणे यांनी म्हटले की, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींना देशभक्ती शिकवण्याची काहीही गरज नाही. एखाद्याने देशाचा झेंडा हाती घेतला नाही म्हणजे त्या व्यक्तीचे देशावर प्रेम नाही, असे कुठं लिहीलं नाही. कोणाचे किती देशप्रेम आहे याबद्दल आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.
नितेश राणे यांच्यावतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी 'मोदी एक्स्प्रेस' ही आरक्षित विशेष रेल्वे सोडण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. नितेश राणे यांनी म्हटले की, मागील दहा वर्षांपासून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष बस, रेल्वे सोडण्यात येते. आठ वर्षांपूर्वी आम्ही लक्झरी बसेसची व्यवस्था करत होतो. तर, दोन वर्षांपासून गणेशभक्तांसाठी विशेष 'मोदी एक्स्प्रेस' सोडण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. मागील अडीच वर्षात कोकणात जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली होती. ठाकरे सरकारने दुर्लक्ष केल्याने कोकणवासियांना मनस्तापाला सामोरे जावे लागत होते असे राणे यांनी म्हटले. सध्या रस्ते सुधारत असून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रस्ता दुरुस्तीबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
ईडी म्हणजे नर्सरी नाही
रोहित पवारांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. ईडीकडून नोटीस पाठवली जात आहे. ईडी म्हणजे नर्सरी नाही. त्यांच्याकडे माहिती आल्यानंतर नोटीसी दिल्या जातात, असेही राणे यांनी म्हटले. आमचे मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांचा स्ट्राइक रेट चांगला आहे. हे लोक आरोप करताना कागदपत्रांच्या आधारे आरोप करतात. कागदपत्रात काही चूक नसेल तर कारवाई होणार नाही. मात्र, रोहीत पवार यांनी आता बायडन, रशिया यावर बोलण्यापेक्षा आपल्या पायाजवळ काय जळतंय याकडे लक्ष द्यावे असा टोलाही त्यांनी लगावला.
अमोल मिटकरींना टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी येण्याचे आमंत्रण दिले होते. भाजपात योग्य दिले जात नसल्याने पंकजा यांनी राष्ट्रवादीत यावे असे अमोल मिटकरी यांनी म्हटले. अमोल मिटकरींनी दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा स्वत: च्या पक्षाकडे लक्ष द्यावे असा टोला नितेश राणे यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विरोधी पक्षनेते पदावरून काय सुरू आहे ते त्यांनी पाहावं. अमोल मिटकरींसारखंच आम्ही जयंत पाटील यांना ऑफर करावी का, असे नितेश राणे यांनी म्हटले. तर, शिवसेना-भाजप युतीचे सरकार ताकदीने सुरू आहे. 2024 पर्यंत हे सरकार कायम राहणार. तुमच्यासोबत उरलेले आमदार सोबत राहतील का, याची काळजी खैरेंनी घ्यावी असे म्हणत राणे यांनी चंद्रकांत खैरेंना प्रत्युत्तर दिले.
महागाईच्या प्रश्नाला बगल
वाढत्या महागाईबाबत प्रश्न विचारला असता नितेश राणे यांनी भाष्य करण्याचे टाळले. महागाईबाबत प्रश्न विचारण्याऐवजी कोकणबाबत प्रश्न विचारावा अशी टिपण्णी त्यांनी केली.