(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महानगरपालिका निवडणुकांसाठी टीम तयार करा; पक्षप्रमुख राज ठाकरेंची 'मनसे' रणनिती
दुखापतग्रस्त असतानाही पक्षाच्या नियोजित बैठकीला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. बुधवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आणखी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची अतिशय महत्त्वाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीसाठी खुद्द पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. त्याशिवाय पक्षातील नेते, सरचिटणीस आणि कार्यकर्त्यांचीही हजेरी यावेळी पाहायला मिळाली.
मुंबईच्या वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या बैठकीत राज ठाकरे यांनी पक्षातील सदस्यांना संबोधत महानगरपालिकांनुसार टीम स्थापन करण्याचे आदेश दिले.
पाच महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी टीम तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय़ या बैठकीत घेण्यात आला. नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, कार्यकर्ते यांचा या टीममध्ये सहभाग असेल. प्रत्येक शहरानुसार ही टीम तयार करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. शिवाय बुधवारी पुन्हा राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी आणखी एक बैठक बोलावली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांची सुरक्षा कमी केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळाली होती. ज्यानंतर मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या बैकीच्या वेळी कार्यकर्त्यांनी सुरक्षेची जबाबदारी घेत महाराष्ट्र रक्षक नावाचं पथक स्थापन केलं आहे. या पथकातील महाराष्ट्र रक्षकांवर राज ठाकरे यांच्या सुरक्षेची धुरा असेल असं मनसैनिकांकडून सांगण्यात आलं आहे.
एकिकडे महाविकास आघाडीतून तीन मोठे पक्ष एकत्र निवडणुकीच्या मैदानात असतानाच आता मनसे कोणत्या पक्षाशी हातमिळवणी करणार यावरही अनेकांच्याच नजरा खिळल्या आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा होती. पण, त्याबाबत मात्र आजच्या बैठकीत चर्चा झाली नाही. त्यावर खुद्द राज ठाकरे सविस्तर आढावा घेऊन निर्णय घेतील असं कळत आहे.
दुखापत असूनही बैठकीला हजेरी
आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये सरशी मिळवण्याच्या उद्देशानं पक्षाची पुढील रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याचं म्हटलं गेलं. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीसाठी राज ठाकरे पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पोहोचले. सोमवारी सायंकाळी टेनिस खेळताना त्यांना ही दुखापत झाल्याचं म्हटलं गेलं. ज्यानंतर डॉक्टरांकडे गेलं असता त्यांना घरीच राहून आराम करण्याचा सल्ला देण्यात आला. पण, पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी हाताला प्लॅस्टर करुन डाव्या हाताला दुखापत असतानाही राज ठाकरे बैठकीच्या ठिकाणी पोहोचले.