Corona Vaccine Drive | राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा, आठवड्याला 20 लाख डोस आवश्यक : राजेश टोपे
महाराष्ट्रात 23 लाख कोरोना लसींचा वापर झाल्याचं ट्वीट आज केंद्रीय मंत्र्यांनी राज्यातील लसीकरणाबाबत केलं. परंतु 3 लाख लस कार्यक्रमानुसार फक्त 10 दिवस पुरेल एवढा स्टॉक उपलब्ध आहे. मुख्यमंत्र्यांनी आज ही बाब पंतप्रधानांच्या कानावर घातली, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.
मुंबई : एकीकडे कोरोना लसीच्या वापरावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं असताना, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर झाल्याचं ट्वीट आज प्रकाश जावडेकर यांनी केलं. त्यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषद राजेश टोपे यांनी राज्यातील लसीकरणाची परिस्थिती सांगितली.
'आठवड्याला 20 लाख डोस आवश्यक'
राजेश टोपे म्हणाले की, "राज्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. राज्यात एकूण 1880 सेंटर मंजूर झाले आहेत. आतापर्यंत 33 लाख 65 हजार 952 लोकांचं लसीकरण केलं आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रण्ट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील इतर आजार असलेल्या लोकांचा समावेश आहे. काल दिवसभरात 2 लाख 32 हजार 340 एवढ्या लोकांचं लसीकरण झालं आहे. आता दिवसाला 3 लाख लोकांचं लसीकरण करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी कोरोना लसही तेवढ्यात प्रमाणात प्राप्त होणं गरजेचं आहे. साधारणपणे एक कोटींहून लोकांचं लसीकरण करायचं आहे. दोन कोटी 30 लाख डोस आपल्याला येत्या तीन महिन्यात आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्याला 20 लाख डोस आवश्यक आहे. मी स्वत: काल केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य सचिव राजेश भूषण यांना भेटून केली आहे.
प्रकाश जावडेकर यांच्या दाव्यावर काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या दाव्यावर राजेश यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, "केंद्रीय मंत्र्यांनी आज ट्वीट करुन सांगितलं की महाराष्ट्रात 31 लाख लस उपलब्ध आहेत. दररोज तीन लाख लस या कार्यक्रमानुसार फक्त 10 दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे, असं मी आरोग्य सचिवांना सांगितलं. तसंच आजच्या व्हीसीमध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील ही बाब पंतप्रधानांच्या कानावर घातली. प्रकाश जावडेकर यांच्याबद्दल आदर व्यक्त करत सांगितलं की, आम्ही दिवसाला 3 लाख दराने लस देत आहोत. त्याप्रमाणे 10 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. लस जाणीवपूर्वक देत नाही असा आमचा आक्षेप नाही. परंतु आम्ही लसीकरणाची गती वाढवली आहे म्हणून रास्त मागणी करत आहोत."
लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज : टोपे
आम्हाला यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आम्ही 367 केंद्रांची मागणी केली, त्यातली 209 केंद्रांना परवानगी मिळाली आहे, उर्वरित केंद्रांना परवानगी मिळणं अपेक्षित आहेत. 100 बेडच्या रुग्णालयांनाच लसीकरणाची परवानगी देण्याची जाचक अट शिथील केली पाहिजे. किमान 50 बेडच्या रुग्णालयांना परवानगी देण्यात यावी," अशी मागणी राजेश टोपे यांनी केली.
हाफकिनमध्ये भारत बायोटेक लस तयार करण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांना आवडला : राजेश टोपे
हाफकिन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून भारत बायोटेकने विकसित केलेली लस तयार करण्याची परवानगी देण्यात यावी, आम्ही लस निर्माण करु शकतो, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या पंतप्रधानांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सदरम्यान दिला. हा प्रस्ताव पंतप्रधानांनाही आवडला, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.