राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई : राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद आता काही नवीन राहिलेला नाही. असाच वाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे. यावेळी निमित्त आहे, विधानसभा अध्यक्षपदाचं. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते. काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. त्या पदाचा कार्यभार सध्या नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे.
1 मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी राज्यपालांनी थेट राज्य सरकारला थेट पत्र लिहिले आणि पत्रातून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार ही विचारणा केली आहे. आज कॅबिनेटमध्ये या पत्राबाबत चर्चा झाली. राज्य सरकार या पत्राला उत्तर देणार आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक कधी होणार हे स्पष्ट करावं लागेल. पण अश्या पद्धतीने पहिल्यांदाच राज्यपालांनी विधीमंडळ कामकाजाबाबत विचारणा केली आहे.
राज्यपालांसोबत शीतयुध्द नाही तर खुलं वॉर सुरुय: खा. संजय राऊत
एकीकडे राज्यपाल नियुक्त 12 जागांबाबत मंत्रिमंडळाने पाठवलेल्या प्रस्तावाबाबत राज्यपालांनी तीन महिने होऊन गेल्यावरही निर्णय घेतला नाही. या संदर्भात राज्य सरकारने दोनवेळा राज्यपालांना आठवण करून दिली, विचारणा केली तरी राज्यपालांनी अजून निर्णय घेतला नाही. पण विधानसभा अध्यक्ष पदाबाबत मात्र थेट राज्यपालांनी विधीमंडळ कामकाजाबाबत हस्तक्षेप करत विचारणा केली आहे. राज्यपाल इथेही राज्य सरकारची कोंडी करत असल्याचे चित्र आहे.
जर राज्य सरकारने राज्यपालांच्या पत्राला वेळेत आणि सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर राज्यपाल काय भूमिका घेतली त्यामुळे राजकारण अजून तापू शकतं. एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पर्शवभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहे.
Sanjay Raut PC | राजभवनाचा वापर राजकीय कारणासाठी होतोय, खासदार संजय राऊत यांचा आरोप