(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यपालांसोबत शीतयुध्द नाही तर खुलं वॉर सुरुय: खा. संजय राऊत
राज्याचे राज्यपाल (Governor) आणि राज्य सरकारमध्ये शीतयुद्ध नसून खुलं वॉर (open war) सुरु असल्याचं सांगत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांच्या आड भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.
मुंबई: राज्यपालांसोबत शीतयुद्ध सुरु नाही तर खुलं वॉर सुरु असल्याचं प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्य सरकारचे अनेक निर्णय राज्यपालांमुळे रखडल्याचे सांगत राज्यपाल भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे युद्ध थेट राज्यपालांकडून नाही तर त्यांच्या आड भाजपकडून खेळण्यात येतंय असं सांगत राजभवनाचा वापर हा राजकीय कारणासाठी होतोय असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज्य सरकारचे अनेक महत्वाचे निर्णय हे राज्यपालामुळे रखडले आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, "राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारसी स्वीकारणे हे राज्यपालांना बंधनकारण आहे असं राज्यघटना सांगतेय. असं असतानाही राज्य सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांचा निर्णय राज्यपालांनी प्रलंबित ठेवलाय. ही घटनेची पायमल्ली आहे. याचा अर्थ राज्यपाल हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत, म्हणून हे खुलं युद्ध आहे, शीतयुद्ध नाही."
'गोध्राकांडातूनच नरेंद्र मोदी हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले', संजय राऊतांची 'रोखठोक' टीका
सत्ता गेल्यानंतर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावं लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'आंदोलनजीवी' हा शब्दप्रयोग वापरल्यानंतर त्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, "उद्या भाजप पक्ष सत्तेतून बाहेर पडला तर आज ते आता ज्या आंदोलनाला विरोध करताहेत तीच आंदोलने त्यांना त्यावेळी करावी लागतील. हा देश लोकशाहीप्रधान आहे. लोकशाहीमध्ये जनता आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत असते. या देशात हुकूमशाही वा लष्करशाही नाही. ज्या देशात हुकूमशाही वा लष्करशाही आहे तिथेही लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत."
शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "आपल्या देशात आंदोलन व्हावी असं जर वाटत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी सामान्य जनतेचा आवाज ऐकला पाहिजे. भाजपला आज आंदोलनाचा तिरस्कार वाटतोय, पण त्याच आंदोलनातून भाजपचा जन्म झालाय. उद्याही त्यांची सत्ता गेल्यानंतर याच प्रकारची आंदोलने भाजपला करावी लागतील."
'राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जातेय', शिवसेनेची 'सामना'तून टीका
खासदार संजय राऊत नाशिकमध्ये शिवसेनेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी नाशिकचेही चित्र लवकरच बदलेल अशी आशा व्यक्त केली. पक्षभेद विसरुन आमदारांचा निधी त्यांना मिळावा याबाबत भुजबळ यांच्याशी चर्चा झाली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचं राऊतांनी सांगितलं. ते म्हणाले की, "राजकारणात एखाद्याचा बळी घ्यायचा, त्याच्या प्रतिमेला तडा जाईल असे प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहेत. संजय राठोड त्यांच्या समाजाचे सर्वोच्च नेते आहेत. विरोधी पक्षाने एक दिशा ठरवली आहे म्हणून त्या दिशेने चौकशी होईल असं नाही. उद्धव ठाकरे कोणाच्याही चुकांवर पांघरुन घालणार नाहीत."
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेवर केलेल्या टिप्पणीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "न्यायव्यवस्थेवर टीका करु नये असं सांगितलं जातं. गोगोई यांनी आपल्या कारकिर्दीत या गोष्टी जर उजेडात आणल्या असत्या तर चांगलं झालं असतं. आता ते भाजपाचे खासदार आहेत. त्यामुळे आम्हाला देखील त्यांच्यावर विश्वास नाही."
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झालीय!