Maharashtra Fuel Price Cut : 'या कपातीचं आश्चर्य वाटतं, मविआकडे केलेल्या मागणीचं काय झालं?'इंधन दर कपातीच्या निर्णयानंतर काँग्रेसचा सवाल
Maharashtra Fuel Price Cut : राज्यात विरोधी पक्षात असताना इंधन कर कपातीची मागणी करणाऱ्या भाजपला काँग्रेसने त्यांना जुन्या मागणीची आठवण करून दिली आहे.
Maharashtra Fuel Price Cut : राज्य सरकारने केलेल्या इंधन दर कपातीवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित करताना भाजपला त्यांच्या जुन्या मागणीची आठवण करून दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये 50 टक्के कपातीची मागणी भाजपने केली होती. या मागणीचे काय झाले, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपला जुन्या मागणीची आठवण करून दिली आहे. शिंदे फडणवीस सरकारने पेट्रोल व डिझेल दरांमध्ये अनुक्रमे पाच रुपये आणि तीन रुपये एवढीच कपात केली याचे आश्चर्य वाटत असल्याचे म्हटले. मविआ सरकारकडे एकूण व्हॅटवर 50 टक्के कपात करा म्हणजे एकूण पेट्रोलवरील 32.55 पैकी पैकी 16.28 रुपये आणि डिझेल वरील 22.37 रुपयांपैकी 11.19 रुपये कमी करा अशी भाजपाची मागणी होती, त्याचे काय झाले असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. सावंत यांनी ट्वीट करताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.
सचिन सावंत यांनी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील त्यांच्या जुन्या आरोपांची आठवण करून दिली आहे. केंद्रीय कराएवढे राज्याचे कर असावेत व राज्याचा कर केंद्रापेक्षा 10 रुपयांनी जास्त असल्याने मविआमुळे महागाई वाढत आहे असा आरोप फडणवीस करत होते. अजूनही केंद्रापेक्षा जास्त महाराष्ट्राचा कर आहेच. त्याचे काय असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. राज्यात कर कपात केल्यानंतरही गुजरात आणि कर्नाटकमधील दर कमी असल्याची आठवणही सावंत यांनी करून दिली आहे.
केंद्रीय कराएवढे राज्याचे कर असावेत व राज्याचा कर केंद्रापेक्षा ₹१० जास्त असल्याने मविआमुळे महागाई वाढत आहे असा आरोप फडणवीस जी करत होते. अजूनही केंद्रापेक्षा जास्त महाराष्ट्राचा कर आहेच. त्याचे काय? अजूनही गुजरात व कर्नाटक मधील दर फार कमी आहेत. त्याचे काय?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 14, 2022
जवाब दो! pic.twitter.com/0PUwYYiEyE
दरम्यान, राज्य सरकारने पेट्रोलवरील करात पाच रुपये आणि डिझेलवरील करात तीन रुपयांची घट झाली असल्याचे जाहीर केले आहे. राज्यात आज मध्यरात्रीपासून नवीन इंधन दर लागू होणार आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 10 हजार कोटींचा बोझा पडणार आहे. राज्यातील विकास कामांवर याचा परिणाम होणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.