Aditya Thackeray | वरळीतून आदित्य ठाकरेंना विजयी आघाडी
आदित्य ठाकरे यांच्याविरोधात महाआघाडीकडून काँग्रेसने सुरेश माने यांना आदित्य ठाकरे यांना उमेदवारी दिली होती. तर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही आदित्य यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती.
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या वरळी मतदारसंघाचा निकाल हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आदित्य ठाकरेंनी विजयी आघाडी घेतली आहे. आदित्य ठाकरेंनी जवळपास 24 हजारांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या मेहनतीचं फळ त्यांना निकालातून मिळत आहे.
आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक सुरुवातीपासून तेवढी चुरशीची किंवा अटीतटीची नव्हती. आज निकालाचे कल हाती येऊ लागले, तेव्हापासून आदित्य ठाकरे यांनी आघाडी घेतली होती. महाआघाडीकडून काँग्रेसने सुरेश माने यांना आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. तर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही आदित्य यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. त्यामुळे बिचुकलेंना किती मते मिळतील याची सर्वांना उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे बिचुकलेंना आता पर्यंत जवळपास 200 मतं मिळाली आहेत.
सचिन आहिर आणि सुनील शिंदेंची ताकद कामी
वरळी विधानसभा निवडणुकीत केवळ आदित्य ठाकरेंचाच बोलबाला दिसला. विद्यमान आमदार सुनील शिंदे आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवेसनेत आलेले सचिन अहिर यांचा मतदारसंघातील प्रभावी प्रचार आणि मतदारसंघातील ताकद याचा मोठा वाटा आदित्य ठाकरेंच्या विजयामध्ये असणार आहे. शिवसेना नेत्यांनी आधीपासून आदित्य ठाकरे जिंकणार असा दावा केला होता. मात्र मताधिक्य किती असणार याकडे सर्वांच लक्ष आहे.
आदित्य ठाकरेंना मनसेचा पाठिंबा
आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे मतांचं विभाजन रोखलं गेलं. याचा फायदाही आदित्य ठाकरेंना झाला. ठाकरे कुटुंबातील एखादा व्यक्ती निवडणूक लढवत असेल तर त्याविरोधात उमेदवार उभं करणे, ठाकरे म्हणून योग्य नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला होता.