Mumbai Local: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; मुंबई लोकल बंद नाही, पण...
मुंबई लोकबाबत कोणता निर्णय घेण्यात येतो, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं. ज्याबाबत पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही मुद्दे स्पष्ट केले.
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता राज्य सरकार आणि पालिका प्रशासनं आता अतिशय महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचले आहेत. मुंबईमध्येही कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी काही महत्त्वाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई लोकलबाबत कोणता निर्णय घेण्यात येतो, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं. ज्याबाबत पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही मुद्दे स्पष्ट केले.
मुंबई लोकलबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, ही सेवा बंद न करता आसन क्षमतेइतक्याच प्रवाशांसह ही सेवा सुरु राहील अशी माहिती समोर आली आहे. शिवाय यापुढं रिक्षा आणि टॅक्सीमध्येही चालकासह फक्त दोन प्रवाशांनाच परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईतील बस सेवेमध्येही आसन क्षमतेइतकेच प्रवासी यापुढं एका वेळी प्रवास करु शकणार आहेत. त्यामुळं लोकल आणि बस सेवेमध्ये होणारी तुडूंब गर्दी यापुढं कमी करण्यावर प्रसासनानं भर देत हे सक्तीचं पाऊल उचललं आहे.
लोकलची गर्दी कायमच...
फेब्रुवारी महिन्यानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खासगी आणि सरकारी कंपन्यांना कमीत कमी कर्मचारी ऑफिसमध्ये बोलवण्याचा सल्ला दिला होता. केवळ पन्नास टक्केच कर्मचारी कार्यालयात बोलवावेत किंवा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला खाजगी कंपन्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. सरकारने स्पष्ट निर्देश दिले असताना देखील खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात केलेली नाही. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे लोकल मधील प्रवाशांची संख्या. खरंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रवासी संख्येत घट होणे अपेक्षित होते. मात्र, चित्र आणखी विदारकच होत गेलं. अखेर प्रशासन पुन्हा एकदा कठोर निर्णयावर पोहोचलं आहे.
दरम्यान, शहराचं अर्थचक्र कोणत्याही प्रकारे थांबवण्यात आलं नसून, येत्या काळात शहरात लसीकरणाचं प्रमाणही वाढवण्यात येणार असल्याचं पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं. राज्य शासनाच्या निर्णयानुसार मुंबईतही वीकेंड लॉकडाऊन लागू असणार आहे. रविवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले जाणार आहेत. मंत्री नवाब मलिकांनी सांगितलं की, कोरोनाला रोखण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले. काही कडक निर्बंध राज्यात घालण्यात आले आहेत. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. तसेच नाईट कर्फ्यू देखील लागू असेल असं त्यांनी सांगितलं.