Eknath Shinde Amit Shah: CM शिंदे आणि अमित शाह यांची मध्यरात्री खलबतं? पंतप्रधान मोदींसोबत आज चर्चेची शक्यता
Eknath Shinde Amit Shah: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात रात्री उशिरा चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे.
Eknath Shinde Amit Shah: बुधवारी सायंकाळी दिल्ली दौऱ्यावर गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली असल्याचे वृत्त आहे. मात्र, या बैठकीतील तपशील समोर आला नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election 2022) आणि वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) वादाच्या मुद्यांवर ही चर्चा झाली असल्याचा कयास बांधण्यात येत आहे. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेणार असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह शिंदे गटातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची याचा वाद आता निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपला दावा मजबूत करण्यासाठी शिंदे गटाने इतर राज्यातील शिवसेना पदाधिकारी आपल्याकडे ओढण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत बुधवारी शिंदे यांनी बैठक घेतली.
मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायती निवडणुक निकालात शिंदे गटाला अपेक्षित यश मिळाले नसल्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने शिंदे गट आणि भाजप यांच्याशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे. तर, राज्यात काही ठिकाणी शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये राडादेखील झाला.
खलबतं कशावर?
महाराष्ट्रात जवळपास निश्चित झालेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने शिवसेना, महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. राज्यातील जवळपास एक लाख रोजगार गुजरातला गेले असल्याचा मुद्दाही तापवण्यात आला. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार काहीसं बॅकफूटवर गेले होते. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुका आणि सरकारच्या वाटचालीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली असल्याची म्हटले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली. आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, पण बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतेय असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'आम्हाला अभिमान आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. पण तुम्ही मग बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? असा खोचक प्रश्न विचारला. शिवसैनिकांवर विश्वास नसल्यानेच त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.