शिवसेनेशी आमचे वैचारिक मतभेद, आमच्यात कधीही शत्रुत्व नव्हतं : देवेंद्र फडणवीस
शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का?यावर देखील तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र आज पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई : आधी मित्र असलेले शिवसेना आणि भाजप 2019 च्या निवडणुकीनंतर काही कारणांनी एकमेकांपासून दूर गेले. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सत्तेची खुर्ची मिळवली. भाजप आणि शिवसेनेची जुनी मैत्री तुटली आणि भाजपला सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधात बसावं लागलं. यानंतर शिवसेना आणि भाजपसह अन्य पक्षांच्या नेत्यांनी देखील भाजप-शिवसेना युतीवर भाष्य केली आहेत. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का?यावर देखील तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र आज पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्यात कधीही शत्रुत्व नव्हतं. आम्ही शत्रू नाही. आमचे वैचारिक मतभेद झाले कारण आमचा हात सोडून आमच्यासोबत निवडून आलेले आमचे मित्र ज्यांच्याविरुद्ध निवडून आले, त्यांचा हात पकडून निघून गेले. त्यामुळेच मतभेद निर्माण झाले. पण तो काही धुऱ्याचा वाद नाहीये की सुधीरभाऊंचा धुरा उद्धवजींच्या धुऱ्याला लागून आहे आणि त्यांनी यांच्या धुऱ्यावर अतिक्रमण केलं असं नाहीये. त्यामुळे आमचं कुठलंही शत्रुत्व नाहीये. वैचारिक मतभेद तर आहेच, असं फडणवीस म्हणाले.
कोविडच्या नावाखाली राज्य सरकारकडून लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम : देवेंद्र फडणवीस
शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या भेटीच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले की, कुणाच्या भेटीगाठी झाल्या, याविषयी मला कल्पना नाही. अधिकृतपणे भाजपा, शिवसेना किंवा कुणाचीही भेटगाठ नाही किंवा चर्चा नाही. भाजपा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊन जनतेसाठी लढा देण्याची आमची तयारी आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.
कोविडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, कोविडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारकडून केलं जात आहे. राज्य सरकारने विधानमंडळात सदस्यांनी बोलू नये अशी व्यवस्था केली जात आहे. राज्याच्या निर्मितीला 60 वर्ष पूर्ण झाले आहेत पण जे 60 वर्षांत घडलं नाही, ते आपल्याला आता घडताना दिसत आहे, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, करोनाचे प्रश्न, लॉकडाउन असे अनेक प्रश्न आहेत. पण या विषयांवर बोलण्यासाठी कोणतंही आयुध आमच्यासाठी शिल्लक ठेवलेलं नाही. राज्याच्या भ्रष्टाचारावर आम्ही बोलूच नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणून आम्ही ठरवलंय की आम्ही सभागृहात जे मांडता येईल, ते मांडण्याचा प्रयत्न करू. जे सभागृहात मांडता येणार नाही ते बाहेर माध्यमांसमोर मांडू, रस्त्यावर येऊन मांडू. अशा प्रकारे लोकशाचीही थट्टा तात्काळ बंद केली पाहिजे, असं ते म्हणाले.
ठाकरे सरकारने 16 महिन्यात प्रसिद्धीवर खर्च केले तब्बल 155 कोटी!
ते म्हणाले की, मिनिट्समध्ये लिहिण्यात आलं आहे की कोणतंही आयुध वापरता येणार नाही. कदाचित अशा प्रकारची लोकशाही आणीबाणीच्या काळात पाहिली असेल. कोविड आहे, वेळ कमी करतोय इथपर्यंत ठीक आहे. पण सदस्यांना कोणतंही संसदीय आयुध वापरता येणार नाही, असा निर्णय म्हणजे लोकशाहीला कुलूपबंद करण्याचा प्रयत्न आहे, असं फडणवीस म्हणाले.