Maharashtra and Karnataka Border Dispute: अखेर महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा पुढे ढकलला, शंभूराज देसाई यांनी सांगितले 'हे' कारण
Maharashtra and Karnataka Border Dispute: राज्याचे मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी आपला बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे.
Maharashtra and Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांचा सीमा प्रश्न (Maharashtra Karanatka Border Issue) तापला असताना आज महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आजचा आपला बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. बेळगावातील काही संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई जाणार होते. मात्र, आजच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बेळगाव दौरा पुढे ढकलत असल्याची घोषणा केली.
सोमवारी, महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी हा दौरा अद्याप रद्द झाला नसल्याचे सांगत या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असे म्हटले होते. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर कोणत्याही परिस्थितीत जाऊ शकतो. पण आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायची आहे, असे म्हटले होते.
आज, पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी बेळगावात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी दौरा पुढे ढकलला असल्याचे सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी म्हटले. आमचा सीमाभागात जाण्याचा दौरा होता. याबाबत आम्ही कर्नाटक सरकारला कळवले होते. बेळगावमधील गावात जाऊन त्याच्याशी चर्चा करणार होतो. मात्र, कर्नाटक सरकारने याला वेगळ वळण दिलं. मुख्य सचिवांना पत्र पाठवून त्यांनी न येण्यास सांगितले आणि कारवाईची भाषा केली. कर्नाटक सरकारने सीमेवर मोठा बंदोबस्तही लावला. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही कारवाईची भाषा करू लागले होते. हे चुकीचं असून भारतातील कुठलाही व्यक्ती इतर राज्यात जाऊ शकतो. आज महापरिनिर्वाण दिनी जाऊन कुठेही या कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. लवकरच चंद्रकांत दादा यांच्याशी बातचीत करून आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले.
राज्य सरकार अडचणीत?
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत तालुक्यातील काही गावे कर्नाटकमध्ये घेणार असल्याचा दावा केल्यानंतर राज्यात संताप व्यक्त करण्यात येत होता. शिवसेना ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर सीमा प्रश्नावरून टीकेचे बाण सोडले होते. त्यानंतर भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगावला जाण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर तेच अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली. माध्यमांनीदेखील चंद्रकांत पाटील टाळू लागले होते. एका मंत्र्यांच्या घोषणेमुळे संपूर्ण राज्य सरकारची प्रतिष्ठा पणाला लागल्याची चर्चा रंगू लागली. तर, दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुख्य सचिवांना आदेश देत महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात आल्यास त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर आज महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी बेळगाव दौरा पुढे ढकलत असल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: