(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Karnataka Border Issue: राज्यातील मंत्र्यांकडून कर्नाटकचा दौरा रद्द का झाला? ही आहेत नेमकी कारणं...
एकीकडे महाराष्ट्रातील मंत्र्यांनी दौरा रद्द केला तर दुसरीकडे कर्नाटकच्या कुरापती मात्र थांबायचं नाव घेत नाहीत. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी ऐनवेळी दौरा रद्द करण्याची घोषणा केली आहे.
Maharashtra Karnataka Dispute : सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बेळगावमध्ये जाण्याची घोषणा चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी केली मात्र ऐनवेळी दौरा रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारवरची कोंडी झालीय. तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून तणावाची स्थिती असताना या प्रश्नावर समन्वयक मंत्री म्हणून ज्यांची नेमणूक केली त्या चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी बेळगावमध्ये जाण्याची घोषणा केली. आधी तीन डिसेंबर रोजी हा दौरा होता परंतु महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी म्हणजे सहा डिसेंबरला दौरा करू असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून सांगितलं पण आता ऐनवेळी हा दौरा देखील रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे.
एकीकडे महाराष्ट्रातील मंत्र्यांनी दौरा रद्द केला तर दुसरीकडे कर्नाटकच्या कुरापती मात्र थांबायचं नाव घेत नाहीत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाप्रश्न संपला असं वक्तव्य करून सीमाभागातील जनतेच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात येणार आहेत. पण आमच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना सध्या येऊ नये असा स्पष्ट लिखित संदेश पाठवला आहे. सध्या वातावरण बरोबर नाही त्यामुळे ते जर कर्नाटकात आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकतो.अशा परिस्थितीत आम्ही कर्नाटकात येणार म्हणणे योग्य नव्हे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जनतेत सौहार्दपूर्ण वातावरण आहे.पण त्याच बरोबर सीमाप्रश्न आहे.कर्नाटकच्या दृष्टीने सीमाप्रश्न हा संपलेला अध्याय आहे.पण महाराष्ट्र हे पुन्हा उकरून काढू पाहत आहे. सीमाप्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात आहे.अशा परिस्थितीत जनतेच्या भावना भडकवणयाचा प्रयत्न करणे योग्य नव्हे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये म्हणून बोलून विनंती करणार आहे.तरीही मंत्र्यांनी कर्नाटकात येण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या बाबत माझे अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे.
चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांनी दौरा का रद्द केला?
कर्नाटकात सध्या भाजपचं सरकार आहे. येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात. या पार्श्वभूमीवर बेळगाव मधील दौऱ्या दरम्यान चर्चा कुणाशी करायची? हा प्रश्न मंत्र्यासमोर आहे. कारण चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना महाराष्ट्र एकीकरण समितीनं निमंत्रण दिलं. तर कर्नाटकात अनेक मराठी नेते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपच्या या नेत्यांशी चर्चा करायची की एकीकरण समितीशी चर्चा करायची यावरून संभ्रम आहे. शिवाय बेळगावमध्ये दौरा केला तर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिघळू शकते, ही भीती आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही मंत्र्यांनी दौरा करू नये, असं सांगितलं होतं त्यामुळेही महाराष्ट्रातील मंत्र्यांची पंचाईत झाली. आणि याच मुद्द्यावरून अनेकांनी सरकारलाही घेरलं आहे.
खरंतर चंद्रकांत पाटील यांनी कारण नसताना आणि मागचा पुढचा फार विचार न करता बेळगावला जाण्याची घोषणा केली. आणि चंद्रकांत दादाच अडचणीत आले. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून बेळगावच्या प्रश्नावर बोलताना माध्यमांपासून ते पळ काढताहेत. पण एका मंत्र्यांच्या चुकीच्या घोषणेमुळे संपूर्ण राज्य सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली. आणि तिकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मात्र लोकप्रिय घोषणा करून या वादात वरचढ ठरले आहेत.
ही बातमी देखील वाचा