Mahadev Online Gaming App : महादेव बुक अॅप प्रकरणात नवा खुलासा, सौरभ चंद्राकर आणि दाऊद इब्राहीमच्या भावाचे संबंध असल्याचा ईडीचा संशय
Mahadev Online Gaming App : महादेव बुक अॅप प्रकरणात सौरभ चंद्राकर आणि दाऊद इब्राहीमच्या भावाचे संबंध असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आलाय.
मुंबई : महादेव बुक अॅप प्रकरणाला (Mahadev Book App) आता नवं वळण मिळालं असल्याचं म्हटलं जात आहे. कारण महादेव बुक अॅपचा संस्थापक सौरभ चंद्राकर (Saurabh Chandrakar) आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा (Dawood) भाऊ मुश्तकीम यांचे संबंध असल्याचा ईडीला संशय आहे. तसेच या दोघांना मिळून महादेव ऑनलाईन बुक अॅप सारखेच अॅप पाकिस्तानात लाँच केल्याचा ईडीने दावा केलाय. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. दरम्यान महादेव बुक अॅप प्रकरणात अनेक कलाकरांवर ईडीची टाच बसली आहे. तर आता यामध्ये दाऊद इब्राहीमच्या भावाचं देखील नाव समोर आलं आहे.
महादेव बुक अॅप प्रकरणाच्या तपासादरम्यान, ईडीला दररोज नवी माहिती मिळत आहे. या संदर्भात ईडीनं अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावलं आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासही सांगितलं. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान, आरोपींनी महादेव बुक अॅप आणि त्याच्याशी संबंधित इतर अॅप्लिकेशन्सद्वारे कमावलेल्या कोट्यवधी रुपयांचा वापर करून अमाप मालमत्ता खरेदी केल्याचं उघड झालं आहे.
महादेव अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर हा मुंबईजवळ पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स बांधण्याच्या तयारीत होता, अशी माहिती आता मिळतेय. त्याचबरोबर सट्टेबाजीने कमावलेल्या पैशांतून सौरभ चंद्राकरनं मध्य प्रदेशात कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली होती अशीही माहिती सूत्रांनी दिलीय.
नेमकं काय आहे प्रकरण ?
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडी सातत्यानं छापेमारी करत आहे. तसेच, याप्रकरणी अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे. आता याप्रकरणी बॉलिवूड रडारवर आलं आहे. बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर सारख्या अनेक मोठ्या नावांचा या प्रकरणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नात 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे लग्न सौरभ चंद्राकरचं होतं. सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे.
सौरभनं त्याचा मित्र रवी उप्पलसोबत 'महादेव ऑनलाईन अॅप' सुरू केलं होतं. या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. त्याच्याशाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड झाले.