तब्बल पाच वर्षांनी लालबाग-परळकरांची चिंता मिटणार; 18 सप्टेंबरपासून लोअर परळ उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरू होणार
गेली पाच वर्षे रखडलेला लोअर परळ ब्रीज सुरू होण्याची प्रतीक्षा आता संपली असून गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजेच, 18 सप्टेंबर रोजी पुलाच्या दुसऱ्या बाजूची एक मार्गिका सुरू होणार
Lower Parel Bridge : गेली पाच वर्षे रखडलेला लोअर परळ ब्रीज (Lower Parel Bridge) सुरू होण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण येत्या 18 तारखेला पुलाच्या दुसऱ्या बाजूची एक मार्गिका सुरू होणार आहे. लोअर परळहून (Lower Parel) प्रभादेवीकडे (Prabhadevi) जाणारी मार्गिका 3 जून रोजी सुरू करण्यात आली होती. लोअर परळहून करी रोडकडे जाणारी एक मार्गिका येत्या सोमवारी सुरू होणार आहे. प्रभादेवी, वरळी, करी रोड आणि लोअर परळच्या रहिवाशांसाठी, तसंच लोअर परळमध्ये नोकरीनिमित्तानं दररोज येणाऱ्यांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे.
लोअर परळ उड्डाण पुलावरील आणखी एक मार्गी गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजेच, येत्या सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागील पाच वर्षांपासून रखडलेल्या लोअर परेलचा पूल अखेर सुरू होणार असल्यामुळे डिलाई रोड, वरळी, लोअर परेल, दादर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे आणि याच कालावधीमध्ये या संपूर्ण परिसरात मोठी वाहतूक कोंडी पाहिला मिळत होती. आता मात्र डिलाय रोडवरून वरळीला, दादरला जाणारी मार्गिका सुरू होणार असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाल्याचं पाहायला मिळू शकतं. मागील पाच वर्ष या परिसरातील नागरिकांना या परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. 2018 साली आयआयटी मुंबई यांनी हा पूल धोकादायक घोषित केला आणि त्यानंतर तत्काळ याचं पाडकाम करण्यात आलं. मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे हा पूल दोन वर्ष रखडला आणि त्यानंतर रेल्वेच्या काही परवानग्यांमुळे त्यामध्ये आणखी वर्ष निघून गेली. परंतु, आता मुंबई महानगरपालिकेनं या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, यासाठी प्रयत्न केलं आणि आता सोमवारपासून या पुलावरील आणखी एक मार्गिका सुरू होताना पाहायला मिळेल.
रेल्व प्रशासन, आयआयटी मुंबई आणि महापालिका अधिकारी यांनी केलेल्या सेफ्टी ऑडिटनंतर लोअर परेल रेल्वे ब्रिज हा धोकादायक असून तो बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी लोअर परेल रेल्वे ब्रिज (ना. म. जोशी मार्ग) 24 जुलैपासून हा वाहनांना वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला होता. पूल बंद केल्याने स्थानिक नागरिकांनी मनस्तापाला सामोरं जावं लागत असल्याची ओरड केली होती. यानंतर महापालिका, रेल्वे, आयआयटी आणि स्थानिक प्रतिनिधींनी पुन्हा या ब्रिजची पाहणी केली. त्यानंतर केवळ पादचाऱ्यांसाठी हा ब्रिज पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पूल बंद करुन महिना उलटला तरी पुलाचं काम काही सुरु झालं नव्हतं. पूल बंद असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर काम सुरु करुन पूल पुन्हा वाहतुकीसाठी सुरु करण्याची मागणी नागरिक करत होते. त्यानंतर पुलाचं काम सुरू झालं, मात्र ते पूर्ण होण्याचं नावच घेत नव्हतं. आता अखेर पूलाची दुसरी मार्गिका सुरू करण्यात येणार आहे.
लोअर परळचा पूल म्हणजे, लालबाग, परळ, वरळी, प्रभादेवी यांना जोडणारा दुवा. गणेशोत्सवात लालबाग, परळमध्ये मोठी गर्दी असते. या काळात लोअर परळचा पूल वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पण गेल्या पाच वर्षांपासून पूलाचं बांधकाम सुरू असल्यानं हा रस्ता पूर्णपणे बंद होता. अशातच आता ऐन गणेशोत्सवात हा पूल सुरू होणार असल्यामुळे लालबाग-परळकरांना खरंच वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.