लांब पल्ल्याच्या मेमू गाड्या 7 एप्रिलपासून सुरू, डहाणू, विरारमधील रेल्वे प्रवाशांना दिलासा
विरारहून सुरत, भरूच, वलसाड व डहाणू या ठिकाणी जाणाऱ्या मेमू सेवा 7 व 8 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहेत.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी 22 मार्च 2020 पासून बंद करण्यात आलेल्या काही मेमू गाड्यांच्या फेऱ्या 7 आणि 8 एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यामुळे अनारक्षित गाड्यांमधून प्रवाशांना गुजरात राज्यात प्रवास करणे शक्य होणार आहे.
पूर्वी सुरू असलेल्या शटल गाड्यांचे रूपांतर मेमू गाड्यांमध्ये करण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय गाड्या व नंतर आरक्षित लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्यानंतरदेखील आंतरराज्य प्रवास करणाऱ्या गाड्यांवर बंदी होती.
विरारहून सुरत, भरूच, वलसाड व डहाणू या ठिकाणी जाणाऱ्या मेमू सेवा 7 व 8 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे दैनंदिन प्रवासाच्या उपयोगी असणारी डहाणू ते बोरिवली फेरी तसेच बोरिवली ते वलसाड फेरी सुरू झाल्यावर औद्योगिक कर्मचाऱ्यांनादेखील लाभदायक ठरणार आहे. पनवेल-डहाणू रोड तसेच बोईसर-दिवा दरम्यान धावणाऱ्या मेमू गाडीच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून रेल्वे प्रशासनाकडे केली जात असली तरीही याबाबत रेल्वे प्रशासनाने अजूनपर्यंत या मागणीला प्रतिसाद दिला नसल्याने विरारपलीकडच्या पश्चिम उपनगरीय क्षेत्रात वास्तव्य करून कामानिमित्त मध्य रेल्वेच्या क्षेत्रात जाणाऱ्या नागरिकांची होणारी परवड कायम राहिली आहे.
गाड्यांचे वेळापत्रक
- सुरत-विरार – मेमू क्रमांक – 09080
6 एप्रिल : सुरतहून संध्याकाळी 6.35 ला सुटून विरारला रात्री 11.35 ला पोहचेल.
- सुरत-विरार – मेमू क्रमांक – 09202
7 एप्रिल : सुरतहून संध्याकाळी 4.25 ला सुटून विरारला रात्री 9.20 ला पोहचेल.
- डहाणू-बोरीवली – मेमू क्रमांक – 09084
8 एप्रिल : डहाणूहून पहाटे 4.55 ला सुटून बोरीवलीला सकाळी 6.40 ला पोहचेल.
- विरार-भरूच मेमू क्रमांक – 09101
7 एप्रिल : विरारहून पहाटे 4.35 ला सुटून भरूचला सकाळी 11.20 ला पोहचेल.
- बोरीवली-वलसाड – मेमू क्रमांक – 09085
8 एप्रिल : बोरीवलीहून सकाळी 7.20 ला सुटून वलसाडला सकाळी 11.10 ला पोहचेल.
- विरार-डहाणू – मेमू क्रमांक – 09083
7 एप्रिल : विरारहून रात्री 10.50 ला सुटून डहाणूला रात्री 12.15 ला पोहचेल.