(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mega Block : रविवारी घराबाहेर पडण्याआधी रेल्वे प्रवासाचं नियोजन करा, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
Local Train Mega Block : रविवारी घराबाहेर पडण्याआधी रेल्वे प्रवासाचं नियोजन करून घ्या. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असल्याने तुमच्या लोकल प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Mumbai Local Mega Block, 03 December : मुंबईकरांनो, रविवारी कोणत्या कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल तर घराबाहेर पडण्याआधी लोकलच्या प्रवासाचं (Mumbai Local Train) नियोजन करा. रविवारी 3 डिसेंबरला मध्य रेल्वेकडून (Central Railway) तांत्रिक काम आणि दुरुस्तीसाठी (Repair and Track Maintenance) मुंबई लोकल रेल्वे (Mumbai Local Railway) मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा. रेल्वे प्रवासाचं नियोजन करून घ्या आणि त्यानंतरच घराबाहेर पडा.
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, 3 डिसेंबर 2023 रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणातही मेगाब्लॉक नसणार आहे.
मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.05 मिनिटांनी सुरु होणार आहे. दुपारी 3.55 मिनिटांनी हा मेगाब्लॉक संपेल. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशीराने पोहोचेल.
हार्बर रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवरप्रमाणे हार्बर रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11.10 मिनिटांपासून ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी, वडाळा येथून वाशी, बेलापूर, पनवेल करता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे, गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. याशिवाया पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला प्लॅटफॉर्म क्र. 8 दरम्यान विशेष सेवा 20 मिनिटांच्या अंतराने चालवल्या जातील.