(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lalbaugcha Raja Visarjan : सकाळी 11.30 ला मार्गस्थ, दुसऱ्या दिवशी 9.15 वा विसर्जन, लाडक्या लालबागच्या राजाला 22 तासांनी निरोप
Lalbaugcha Raja 2023 Visarjan : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला, लालबाग-परळकरांसोबतच अखंड गिरणगाव आणि जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा निरोप घेतला.
मुंबई (Mumbai) : पुढच्या वर्षी लवकर या... चैन पडे ना आम्हाला... अशी भावनिक साद घालत लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja 2023) भाविकांनी निरोप दिला. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला, लालबाग-परळकरांसोबतच अखंड गिरणगाव आणि जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा निरोप घेतला. सकाळी नऊ वाजता लालबागचा राजा गिरगावच्या समुद्रात (Girgaon Chowpatty) विसर्जित झाला. राजाला निरोप देण्यासाठी यावेळी भाविकांचा जनसागर उसळला होता. जवळपास 22 तासांच्या मिरवणुकीनंतर राजाला निरोप देण्यात आला.
ओहोटीमुळे विसर्जनाला विलंब
काल सकाळी साडे अकराच्या सुमारास लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी राजाचं स्वागत झालं, पुष्पवृष्टी झाली आणि मजल दरमजल करत आज सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. परंतु सकाळी समुद्राला ओहोटी असल्याने विसर्जनसाठी आलेले लालबागच्या राजासह अनेक गणपती रांगेतच होते. समुद्राला भरती आल्यानंतर लालबागचा राजाला तराफ्यावर ठेवलं. आरती करण्यात आली आणि त्यानंतर विसर्जनासाठी समुद्राकडे मार्गस्थ करण्यात आलं.
कोळी बांधवांकडून राजाला सलामी
कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाला बोटींची सलामी देण्यात आली. समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी पाहायला मिळाल्या. चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुद्रात जात लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. यावेळी पोलिसांचा देखील बंदोबस्त होता.
यंदाही लालबागच्या चरणी लाखो भाविक लीन
दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती. अगदी 24 तास रांगेत उभं राहून भक्त राजाच्या चरणी नतमस्तक होताना पाहायाला मिळाले. गणेशोत्सवादरम्यान नेते, कलाकार, सामन्यांनी त्याचं दर्शन घेतलं. दहा दिवस मनोभावे पूजाअर्चा करुन बाप्पा जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतही भक्तांचा अलोट जनसागर लोटला होता.