कंगनाच्या ऑफिसवर केलेली कारवाई तिरस्काराच्या भावनेतून : रामदास आठवले
कंगनाच्या पाली हिल येथील ऑफिसमधील अतिक्रमण महापालिकेने तोडल्या नंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर आज रामदास आठवले यांनी कंगनाची तिच्या घरी जाऊन भेट घेतली.
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिच्या ऑफिसवर मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जी कारवाई केली आहे ती केवळ कंगना बद्दलच्या तिरस्कारामुळे केली आहे. मुंबई महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले यांनी आज कंगना रनौतच्या खार येथे असणाऱ्या घरी जाऊन तिची भेट घेतली. त्यानंतर रामदास आठवले पत्रकार परिषदेत बोलत होते.
कंगना रनौतत हिला घाबरण्याचे कारण नाही. रिपब्लिकन पक्ष तिच्या पाठीशी आहे असं अश्वासन देखील आपण कंगना रनौतला दिल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. मागील काही दिवसांत कंगना हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई विषयी सातत्याने बदनामीकारक ट्वीट केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यानंतर कंगनावर निशाणा साधला होता. मुंबईतील महिला शिवसैनिकांनी कंगणा राणावतचे पोस्टर जाळून आंदोलन केलं होतं. कंगणा मुंबईत आल्यानंतर आम्हीच तिला धडा शिकवू असा पवित्रा महिला शिवसैनिकांनी घेतला होता.
आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा; मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत कंगनाची टीका
शिवसेनेच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आमचा पक्ष अभिनेत्री कंगना रनौतचे रक्षण करेल तसेच तिच्या घराला पहारा देखील देण्यात येईल असं म्हणाले होते. बुधवारी कंगनाच्या पाली हिल येथील ऑफिसमधील अतिक्रमण महापालिकेने तोडल्या नंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर आज रामदास आठवले यांनी कंगनाची तिच्या घरी जाऊन भेट घेतली.
खारच्या फ्लॅटवरुन कंगनाचं शरद पवारांकडे बोट, जितेंद्र आव्हाडांचं कंगनाला उत्तर
पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हटलं की, मुंबईत राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कंगना देखील आपण मुंबईकर असल्याचं बोलली आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणी आपण कोर्टात जाणार आहोत. असं देखील कंगना म्हणाली, कारण नुकतच जानेवारी महिन्यात तिने नवीन ऑफिस तयार केलं होतं. तिच्या म्हणण्यानुसार काही थोडफार अनधिकृत बांधकाम असेल त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. कारवाई करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या ऑफिसमधील सर्व फर्निचर देखील तोडून टाकलं आहे. याला जबाबदार कोण असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे. मुंबई महापालिकेने आपल्याला भरपाई देखील द्यावी अशी मागणी कंगनाने केली आहे. आपली चित्रपटांच्या माध्यमातून जी कमाई झाली होती ती आपण पूर्णपणे या ऑफिससाठी वापरल्याची माहिती कंगनाने दिली आहे.