आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा; मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत कंगनाची टीका
काश्मिरी पंडितांसोबत काय घडलं हे मला आज कळलं. आज मी देशातील जनतेला वचन देतो की मी केवळ अयोध्यावरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवणार आहे, असं कंगना रनौतने म्हटलं.
मुंबई : शिवसेनेने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रनौत आज दुपारी साडेतीनच्या सुमारास तिच्या मुंबईतल्या खार परिसरातील घरी पोहोचली. धमकीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षेच्या गराड्यात कंगनाला तातडीने तिच्या घरी नेण्यात आलं. कंगनाच्या घराबाहेरही चोख सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. घरी पोहोचताच कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत, "आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा" असं कंगनाने म्हटलं. कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, "उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर पाडून मोठ बदला घेतला आहे. आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अहंकार तुटेल. हे काळाचे चक्र आहे, लक्षात ठेवा हे नेहमीच सारखं नसतं. मला वाटतं तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आहेत. कारण काश्मिरी पंडितांसोबत काय घडलं हे मला आज कळलं. आज मी देशातील जनतेला वचन देतो की मी केवळ अयोध्येवरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवणार आहे. आणि माझ्या देशवासियांना जागे करणार आहे. कारण जे माझ्याबाबतीत घडलं ते कुणासोबतही घडेल. उद्धव ठाकरे ही क्रुरता आणि दहशत माझ्यासोबत घडली हे चांगलं झालं. जय हिंद जय महाराष्ट्र.
कंगना रनौत मुंबईत येणार असल्यानं शिवसेनेचे कार्यकर्ते तिचा विरोध करण्यासाठी मुंबई विमानतळावर मोठ्या संख्येनं जमले होते. तर दुसरीकडे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनीही तिला सुरक्षा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. घरी पोहोचल्यावरही कंगनाच्या घराबाहेर शिवसैनिकांचा विरोध बघायला मिळाला. मुंबई व मुंबई पोलिसांविरुद्ध वक्तव्य केल्यामुळे कंगना शिवसेनेच्या रडारवर आली होती. मुंबईत भीती वाटत असेल तर स्वत:च्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला शिवसेनेनं कंगनाला दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कंगनानं शिवसेनेला आव्हान दिलं होतं.