रेल्वेत नोकरीला लावण्याच्या बहाण्याने कबड्डी खेळाडूंची फसवणूक, आरोपीला अटक
रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कबड्डी खेळाडूंची फससवणूक करणाऱ्या तोतयाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक या भामट्याने केली असल्याचा अंदाज असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
![रेल्वेत नोकरीला लावण्याच्या बहाण्याने कबड्डी खेळाडूंची फसवणूक, आरोपीला अटक Kabaddi players cheat saying given job in railway department रेल्वेत नोकरीला लावण्याच्या बहाण्याने कबड्डी खेळाडूंची फसवणूक, आरोपीला अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/20034700/kabaddi-fraud.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील कबड्डी खेळाडूंना रेल्वे खात्यात नोकरीला लावतो, असं आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या खेळाडूंकडून एका तोतयाने प्रत्येकी पाच ते सात लाख रुपये घेऊन त्यांना गंडा घातला आहे. गेली 5 महिने या तोतयाचा तपास फसवणूक झालेले खेळाडू करत होते. आज अखेरीस कुर्ला येथे एका कबड्डी खेळाडूची पाच लाख रुपयांची फसवणूक करत असताना या खेळाडुंनी त्याला रंगेहात पकडलं. याप्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.
रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तोतयाचं नाव दर्पण साखरकर असं या आहे. गेली दीड वर्ष तो मुंबई परिसरातील कबड्डी खेळाडूंना गाठून, नोकरीचं आमिष देऊन त्यांना लुबाडत होता. कुणाकडून साडेचार लाख रुपये, तर कुणाकडून पाच ते सहा लाख रुपये अशी रक्कम सांगून तो त्यांच्याकडून हप्त्याहप्त्याने पैसे वसूल करत होता. कबड्डी खेळाडू ही आपल्याला नोकरी मिळेल या आशेने त्याला कधी रोख तर कधी चेकने पैसे देत होते. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून हा भामटा अचानक गायब झाला आणि त्याचा फोनही बंद होता.
त्यानंतर हे सर्व कबड्डी खेळाडू आणि सामान्य नागरिक त्याचा शोध घेत होते. आज संध्याकाळी एका कबड्डी खेळाडूला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हा तोतया कुर्ला परिसरात पोहोचला. याची माहिती इतर खेळाडूंना कळताच त्यांनी सापळा रचून या तोतयाला ताब्यात घेतलं. यावेळी त्याने कुणाकुणाची फसवणूक केली आणि किती पैसे उकळले याची माहिती लेखी स्वरुपात या खेळाडूंनी घेतली आणि त्याला काळाचौकी पोलिसांच्या स्वाधीन केलं.
दर्पण साखरकर रेल्वे विभागात नोकरीला होता. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून तो कामावर हजर झालेला नाही, अशीही माहिती मिळत आहे. केवळ कबड्डी खेळाडू नव्हे तर शासकीय रुग्णालय, शासकीय कार्यालयात आपली ओळख आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला नोकरी लावतो अशा बाता मारुन हा अनेकांना फसवत होता. आपल्याला नोकरी मिळेल या आशेने लोक त्याला हप्त्याहप्त्याने पैसे देत होते. त्याने केवळ दादर परिसरात दोन ते अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मुंबईच्या इतर भागातील तरुणांची मोठ्या प्रमाणात याने फसवणूक केली असल्याचा अंदाज आहे. दर्पण साखरकरला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी कळताच फसवणूक झालेले तरुण काळाचौकी पोलीस स्टेशनसमोर जमू लागले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास काळाचौकी पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)