शरद पवारांनी ठरवलंय, 2024 मध्ये हेच सरकार आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री : जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad : 2024 मध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार, त्यावेळसही शरद पवार यांच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
Jitendra Awhad Statement on Maharashtra Government : महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं असून त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आहेत. 2024 मध्ये होणारी निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाणार आहे. त्यावेळेसही महाविकास आघाडीचे सरकार येऊन शरद पवार यांच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत, खाजगीतली गोष्ट सांगतो असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. तसेच यावेळी बोलताना शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर कोणताही निर्णय घेण्यासाठी दबाव नसल्याचंही आव्हाडांनी स्पष्ट केलं.
शरद पवारांबाबत खाजगीतला किस्सा सांगतो... : जितेंद्र आव्हाड
नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांनी खाजगीत बोललेली गोष्ट बोलून दाखवली. पुढील मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच असल्याचं स्पष्ट केल्याची आठवण आव्हाड यांनी सांगितली. तसेच त्यामुळे शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर कोणताही निर्णय घेण्यासाठी दबाव नसल्याचंही आव्हाड यांनी म्हंटलं आहे.
नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता असल्यानं सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विभागवार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार योग्य रित्या आपला कारभार करीत असून 2024 नंतरही हेच सरकार येणार असल्याचं सांगितलं. दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेनेवर मात्र टिका केली आहे.
शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असतो. मुख्यमंत्री यांना स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्यात अडचण येते, असं बाहेर पसरवलं जात आहे. मात्र यामध्ये कोणतंही तथ्य नसून शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा उध्दव ठाकरे यांना असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. मुख्यमंत्री असलेल्या पदाला मान दिला पाहिजे. त्यामुळे ते घेतील त्या निर्णयाचे आपण स्वागत केलं पाहिजे, अशी शिकवण पवारांनी आम्हाला दिल्याचं यावेळी आव्हाड यांनी कबूल केलं आहे.
पाहा व्हिडीओ : शरद पवारांनी सांगितलंय, 2024 मध्येही हेच सरकार आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री!
शिवसेना मनमानी पध्दतीनं वॉर्ड रचना करते... लोकशाहीला घातक : जितेंद्र आव्हाड
आघाडी सरकार सुरळीत सुरू असलं तरी स्थानिक पातळीवर सर्व काही अलबेल नसल्याचे संकेतही आव्हाड यांनी दिले आहेत. निवडणूका आल्या की, सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी मनपा अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल, अशी वॉर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता. मात्र आम्ही विरोध केल्यानं आयोगानं वॉर्ड रचनेत बदल होऊन दिले नाहीत. मात्र जर असे मनमानी कृत्य करून वॉर्ड रचना पाडली जात असेल तर ही लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगानं लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
मौका सभी को मिलता है... जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा
आघाडी धर्म पाळून आम्ही विरोध पक्षात असलेल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर टिका करायची. पण तुम्ही मात्र पडद्या मागून संबंध ठेवायचे. मग आम्ही कशाला शत्रूत्व घायचे? राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे? याचे पर्याय खुले असल्याचं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. ठाण्यात आघाडी करून निवडणूका लढूया असा पर्याय आपण शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना दिला आहे. यावर विचार न झाल्यास आपापसांत पाय खेचण्यात ठाणे जिल्हा भाजपाकडे गेल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :