(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Barge P-305 वरील 13 जणांचे मृतदेह भारतीय नौदलाच्या हाती : सूत्र
मुंबईच्या समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 वरील 13 जणांचे मृतदेह नौदलाच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे दोन दिवसांपूर्वी बार्ज P-305 चा नांगर तुटल्याने ते समुद्रात भरकटलं होतं.
मुंबई : तोक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका समुद्रात अडकलेल्या जहाजांना बसला आहे. भारतीय नौदलाचं समुद्रात अडकलेल्यांसाठी मदत आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. बार्ज P-305 वरील 13 जणांचे मृतदेह नौदलाच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे. मुंबईच्या समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 साठी नौदलाचं 'ऑपरेशन 707' सध्या सुरु आहे.
तोक्ते चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासून बार्ज P-305 चा नांगर तुटल्याने ते समुद्रात भरकटलं होतं. तेव्हापासून बार्ज P-305 वर अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या शोध आणि बचावासाठी नौदलाचं ऑपरेशन सुरु आहे. बार्जवरील 185 जणांची सुटका करण्यात आली. परंतु बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 13 जणांचे मृतदेह नौदलाच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चार मृतदेह आणले असून उर्वरित मृतदेह दुपारपर्यंत आणण्यात येतील असं समजतं. या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांची ओळख पटवून मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात येतील. तर उर्वरित बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचं काम नौदलाकडून सुरु आहे.
समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 नौकेवर एकूण 261 कर्मचारी अडकले होते. त्यापैकी 184 कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. तर 77 जण बेपत्ता होते. या बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेतानाच नौदलाच्या हाती 13 मृतदेह लागले. दरम्यान नौदलाचं शोध आणि बचावकार्य सुरुच राहणार आहे. आयएनएस तेग, आयएनएस बेट्वा, आयएनएस बीस, P8I विमान आणि सीकिंग हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम सुरु आहे. तर आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता आज मुंबई बंदरात परतणार आहेत.