एक्स्प्लोर
आपल्या देशात व्यंगचित्रकाराला किंमत नाही, राज ठाकरे यांची खंत
व्यंगचित्र कारकिर्दीच्या पन्नाशीनिमित्त 'रेषा विकासची भाषा 50 वर्षांची' या विशेष कार्यक्रमात विकास सबनीस यांचा गौरव करण्यात आला.

मुंबई : "आपल्या देशात व्यंगचित्रकारला किंमत नाही. जेव्हा आरके लक्ष्मण गेले तेव्हा मोजून शंभर लोकही त्यांचे अंत्यंदर्शन घेण्यासाठी आले नव्हते," अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसंच "ज्या आरके लक्ष्मण यांची ही अवस्था असेल तर इतरांचं काय बोलायचं," असंही ते म्हणाले. विकास सबनीस यांच्या 50 वर्षांच्या कारकीर्दीचा विशेष गौरव सोहळा काल (20 फेब्रुवारी) राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित शिवाजी पार्क इथल्या सावरकर सभागृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. व्यंगचित्र कारकिर्दीच्या पन्नाशीनिमित्त 'रेषा विकासची भाषा 50 वर्षांची' या विशेष कार्यक्रमात विकास सबनीस यांचा गौरव करण्यात आला. "पाच वर्षात विकास दिसला की नाही याची मला कल्पना नाही, पण 50 वर्षात मला विकास सबनीस यांच्या रुपाने दिसला," अशी कोपरखळीही राज ठाकरेंनी मारली. "आज युरोप किंवा बाहेरच्या देशात कलाकारांना जी किंमत आहे, ती आपल्या देशात नाही," असंही ते म्हणाले. "गेली 50 वर्ष व्यंगचित्र कला सोडून कोणतीही नोकरी केलेली नाही. ही कला 50 वर्ष जोपासणं हे आरके लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर विकास सबनीस यांचं नाव घ्यावं लागेल," असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. म्हणून मी अविरतपणे व्यंगचित्र काढू शकलो : विकास सबनीस "मी अनेकदा राजकारण्यांवर भाष्य करणारी व्यंगचित्रे काढली. पण ही व्यंगचित्रे त्यांनी नेहमीच खिलाडूवृत्तीने घेतली, त्यामुळेच मी इतकी वर्षे अविरतपणे व्यंगचित्रे काढू शकलो," असं मत व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी यावेळी व्यक्त केलं. "1968 मध्ये माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये आरके लक्ष्मण आणि ‘मार्मिक’मध्ये बाळासाहेब ठाकरे यांची कार्टून्स बघून मी प्रभावित होत असे. बाळासाहेबांची कार्टून्स आणि त्यामागील त्यांचा राजकीय विचार आणि त्यामागील विचारशक्ती हे मला प्रभावित करत असत. त्यामुळेच मी राजकीय कार्टूनिस्ट होण्याचं ठरवलं आणि स्वतः शिकत गेलो," असं सबनीस यांनी सांगितलं. "बाळासाहेब ठाकरे यांनी मला त्यांचा वारसदार म्हणून 'मार्मिक'मध्ये कार्टून काढण्याची संधी दिली तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोलाचा क्षण होता. मी त्यांच्या कॉलमसाठी कार्टून काढत असे. तोच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता," असं विकास सबनीस यांनी यावेळी सांगितलं.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















