(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BEST : घोडे ट्राम ते 'बेस्ट' सेवा; असा झाला देशातील पहिल्या सार्वजनिक वाहतूक सेवेचा शुभारंभ
आजच्याच दिवशी, 95 वर्षांपूर्वी मुंबईत बेस्टची पहिली बस धावली होती. हा देशातील सार्वजनिक वाहतूक सेवेचा शुभारंभ होता. आजही बेस्ट सेवा मुंबईची 'बेस्ट सेवा' बनून कार्यरत आहे.
मुंबई : मुंबई म्हणजे एक मायावी शहर. या शहराची कुणालाही भूरळ पडतेच. अशी एखादीच व्यक्ती या भूतलावर सापडेल ज्याला मुंबईसारखं शहर आवडणार नाही. या शहरात असंख्य लोकं येत असतात आणि ही मुंबई सहजपणे त्यांनी स्वीकारते, आपलसं करते. याच मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते ती म्हणजे मुंबईची बेस्ट बस आणि लोकल. आजपासून बरोबर 95 वर्षांपूर्वी म्हणजेच 15 जुलै 1926 रोजी बेस्ट या भारतातील पहिल्या सार्वजनिक सेवेचा प्रारंभ झाला होता. आजही बेस्ट सेवा मुंबईची 'बेस्ट सेवा' बनून कार्यरत आहे.
कुठून कुठपर्यंत धावली बस ?
ही बस सेवा फक्त मुंबईपूरतीच नाही तर संपूर्ण देशभरातून पहिल्यांदा सुरु करण्यात आली होती. बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट (BEST) या नावाने ही बस सेवा सुरु झाली होती. मुंबईमध्ये पहिल्यांदा अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केटपर्यंत बस धावली होती. सरकार आणि पालिकेच्या सुचनेनुसार कंपनीने 1934 साली उत्तर मुंबईत बस सेवेचा विस्तार करण्यात आला. यानंतर 1937 साली पहिल्यांदा डबल डेकर बस रस्त्यावर धावताना दिसली. परंतु मुंबईत आणि देशात पहिली लिमिटेड बस सेवा 1940 साली कुलाबा ते माहीम दरम्यान सुरु झाली होती.
'बेस्ट' ला टॅक्सी ड्रायव्हरांचा विरोध
जेव्हा मुंबईमध्ये पहिल्यांदा बस सेवेची सुरुवात झाली त्यावेळी मोठ्या उत्साहात, जोशात स्वागत करण्यात आलं. पण संपूर्णपणे परिवहनाचं साधन व्हायला तिला वेळ लागला. टॅक्सी ड्रायव्हरकडून त्यावेळी वेळोवेळी याचा निषेध नोंदवण्यात आला. अर्थात त्यांना भीती होती ती म्हणजे आपल्या पोटावर पाय येण्याची. प्रचंड विरोधानंतरही सुरुवात झाल्यानंतर जवळपास 6 लाख प्रवाशांना यात्रा देण्यात बेस्ट यशस्वी झाली आणि त्यानंतर ही संख्या जवळपास 38 लाखाच्या घरात गेली.
'बेस्ट'ची सुरुवात
1995 सालापर्यंत बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँण्ड ट्रान्सपोर्टला बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अॅंड ट्रान्सपोर्ट म्हटलं जायचं. 1873 साली एक सार्वजनिक परिवहन आणि वीज निर्मिती संस्था बॉम्बे ट्रामवे लिमिटेड या नावाने स्थापन केली गेली. या कंपनीने नोव्हेंबर 1905 मध्ये वाडी बंदर येथे एक बंदिस्त औष्णिक उर्जा केंद्र स्थापित केलं होतं..
'नाव कसं बदललं'
1926 साली बेस्ट मोटार बसची ऑपरेटर बनली आणि1947 साली बेस्ट उत्कृष्ट नगरपालिका संस्था बनली. नंतर तिचे नाव बदलून बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट असं केले. पुढे तीच बेस्ट म्हणून प्रसिद्ध झाली. 1995 साली शहराचं बंबई हे नाव बदलून मुंबई असं करण्यात आलं आणि बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व वाहतूक या नावाने याची पुनर्रचना करण्यात आली जेणेकरुन 'बेस्ट' नाव कायम राहिले. आजही बेस्ट ही मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत स्वतंत्र संस्था आहे.
1865 पासूनच विचार
आज आपण बेस्टची जी भरभराट पाहत आहोत ती काही रातोरात झालेली नाही. पूर्वी मुंबईसाठी वाहतूक व्यवस्था तयार करण्यासाठी प्रस्ताव आणण्यात आला होता. तो एका अमेरिकन कंपनीने प्रस्तावित केला होता. ज्याने घोड्याने काढलेल्या ट्राम सिस्टमच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. यानंतर बॉम्बे ट्रॅमवे कंपनी लिमिटेडने बॉम्बेमध्ये घोडे ट्राम चालवले होते.
'घोडे ट्राम ते इलेक्ट्रिक ट्राम'
9 मे 1874 साली पहिल्यांदा घोड्यांनी खेचणारी ट्राम मुंबईत चालली. जी क्रॉफर्ड मार्केटवरुन कुलाबा, काळबादेवीवरुन बोरीपर्यंत चालली होती. त्यानंतर 1905 सालापासून इलेक्ट्रिक ट्राम आणि बस धावायला सुरुवात झाली पण बेस्ट कंपनी स्थापन झाल्यानंतर दोन वर्षानंतर पहिल्यांदा शहरात ईलेक्ट्रिक ट्राम धावली.
1947 साली बीएमसीने बेस्टच्या बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवे कंपनी लिमिटेडचा ताबा घेतला आणि बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्टला हस्तांतरित केलं. बीएमसीने बस सेवा देखील ताब्यात घेतली, त्यानंतर 1995 नंतर ही व्यवस्था पुर्नगठीत करण्यात आली.
आज भलेही मुंबई मेट्रोसिटी झाली असली तरीही मुंबईची परिवहन सेवा असलेल्या 'बेस्ट'विना ती कायमच अधुरी राहील.
पहिल्या बेस्टचा प्रवास-
बस मार्ग- ए.अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट (संपूर्ण आठवडाभर सुरु)
बस मार्गाची लांबी- 5.7 किमी.
प्रवासमार्ग- अफगाण चर्च, मिडल कुलाबा, वूडहाऊस रोड, म्युझिएम पश्चिम बाजू, हॉर्नबी रोड, बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) क्रॉफर्ड मार्केट
पहिली बस- सकाळी 6.30 वाजता (अफगाण चर्च)
शेवटची बस- रात्री 11.20 मिनिटे (क्रॉफर्ड मार्केट)
प्रवास भाडे- 2 ते 6 आणे, अंतराप्रमाणे
बस ताफा- 3 एकमजली बसेस
बस निर्माते- मे. थ्रॉनीक्रॉफ्ट, इंग्लंड
कर्मचारी- 5 बसचालक, 10 वाहक
पहिले बसवाहक- फकीर मोहम्मद बाबा उर्फ कुंभार्लीकर
पहिले प्रवासी- सी. लुकार (वाहतूक व्यवस्थापक, बेस्ट)
(मुंबई बेस्टचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो)
महत्वाच्या बातम्या :