Parbhani : तीन सख्या भावांच्या घरी एकाच दिवशी चोरट्यांचा डल्ला; परभणीतील घटना
परभणीतील पालममध्ये तीन सख्या भावांच्या घरी चोरी करुन चोरट्यांनी तब्बल 11 लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
परभणी : परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील बनवसमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन सख्या भावांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. घरफोडी करुन चोरट्यांनी तब्बल 11 लाखांचा ऐवज लंपास केल्याचा गंभीर प्रकार घडलाय. याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालम तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या बनवस गावातील गोविंद रामराव सुरनर, मोहन रामराव सुरनर व लक्ष्मण रामराव सुरनर या तीन भावांच्या घरात 13 जुलैला मध्यरात्रीच्या वेळी सर्वजण गाढ झोपेत असताना कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. यानंतर घरातील कपाटाचे कुलूप तोडून 85 किलो चांदी, 32 तोळे सोने व एक लाख 42 हजार 500 रुपये इतकी रोख रक्कम लंपास केले आहेत. हा एकूण 11 लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
सुरनर कुटुंबिय पहाटे झोपेतून जागे झाल्यानंतर ही घटना लक्षात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष राठोड, पोलीस निरीक्षक दीपक शेळके, उपनिरीक्षक विनोद साने, पोलीस कर्मचारी दीपक केजगीर यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले. मात्र श्वानाला ही चोरट्यांचा मार्ग सापडला नाही, तो तिथेच काही काळ घुटमळला. याशिवाय फिंगर प्रिंट पथकाने ही घटनास्थळी दाखल होत काही फुट प्रिंट्स घेतल्या.
दरम्यान, या प्रकरणी गोविंद रामराव सुरनर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरांच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली आहेत.
महत्वाच्या बातम्या :